US Elections 2020 : तब्बल 93 % मते मिळवत मराठी माणूस थेट मिशिगन राज्याच्या प्रतिनिधीगृहात

वॉशिंग्टन : पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेच्या निवडणुकीचे कनेक्शन थेट मराठी माणसापर्यंत पोहचले आहे. भारतीय वंशाचे श्रीनिवास ठाणेदार हे मिशीगन राज्याचे स्टेट रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून नुकतेच निवडून आले आहे.

डेमोक्रैट्स आणि रिपब्लिकन यांच्यामध्ये अर्धा विभागलेला ‘अमेरिकन दुभंग’ अध्यक्षीय निवडणुकीने पृष्ठभागावर आणल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार बोलत होते.

ते म्हणाले, माझ्या मूळगावी बेळगावमध्ये असताना आमची अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. पण डगमगलो नाही ४१ वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो. मी आज या देशाच्या कृपेने धनवान झालेला असलो, तरी दारिद्र्य म्हणजे काय आणि संधींचा अभाव किती क्लेशदायक असतो याचा अनुभव मी घेतलेला आहे, हे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना पटले, म्हणूनच त्यांनी मला ही संधी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्वभावाला साजेशी आक्रमक आणि हटवादी भूमिका घेऊन निवडणूक निकालाच्या बाबतीत कज्जेदलाली सुरू केलेली असली, तरी अमेरिकन राज्यघटना जी मूल्ये मानते, त्याच्या विरोधी निकाल अमेरिकन न्यायालये कधीही देणार नाहीत; त्यामुळे जो बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या वाटेत कसलेही न्यायालयीन अडथळे येणार नाहीत, अशी खात्रीही ठाणेदार यांनी व्यक्त केली.