अमेरिकेतील कोर्टाचा मोठा निकाल, जॉर्ज फ्लॉएड हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी दोषी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – मागील वर्षी अमेरिकेत झालेल्या कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉएडच्या हत्या प्रकरणात वॉशिंग्टनच्या हेनपिन काउंटी कोर्टाने निकाल दिला आहे. या प्रकरणात कोर्टाने पोलिस अधिकाऱ्याला दोषी ठरवले आहे. कोर्टाच्या ज्युरींनी 10 तासांच्या दिर्घ चर्चेनंतर आरोपी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन हा तीन गुन्ह्यात दोषी आढळला. दोन महिन्यात डेरेकच्या शिक्षेबाबत सुनावणी होणार आहे. जॉर्जवर पोलीस करवाई करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जॉर्जच्या मृत्यूनंतर आंदोलन उसळले होते.

12 सदस्यीय ज्युरींनी डेरकवर सेकंड डिग्री मर्डर, थर्ड डिग्री मर्फर आणि सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवत दोषी ठरविले आहे. या खटल्यात पोलीस अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ आणि इतर मिळून 45 साक्षीदारांच्या जबाब नोंदवण्यात आले. न्यायालयाच्या निवाड्यावेळी डेरेकला हातात बेड्या घालून आणण्यात आले होते. या निवाड्यानंतर न्यायालयाबाहेर जमलेल्या हजारो लोकांनी जल्लोष केला. त्याला दोषी ठरवल्यानंतर मंगळावारी रात्री मिनेसोटा तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली.

काय होऊ शकते शिक्षा ?

अमेरिकन कायद्यानुसार, दुसऱ्या श्रेणीतील गैर-हेतुपरस्पर करण्यात आलेल्या हत्येसाठी अधिकाधिक 40 वर्षाची शिक्षा, तिसऱ्या श्रेणीत येणाऱ्या हत्या प्रकरणात 25 वर्षाची शिक्षा आणि दुसऱ्या श्रेणीत येणाऱ्या हत्येच्या प्रकरणात 10 वर्षाची किंवा 20 हजार डॉलरचा दंड आदी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे दोषी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन याला 75 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, ही शिक्षा एकत्र भोगावी लागेल किंवा वेगवेगळ्या असतील हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

डेरेकला एकत्रित शिक्षा सुनावली तरी..

डेरेकला एकत्रितपणे शिक्षा सुनावली तरी त्याला तुरुंगात कमीत कमी 12 वर्षे 6 महिने आणि अधिकाधिक 40 वर्षे काढावी लागतील. ज्युरी पॅनेलमध्ये 6 श्वेतवर्णीय, 6 अश्वेतवर्णीय आणि 1 मल्टिरेशियल ज्युरीचा समावेश होता. यात 7 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश होता. या निकालावर प्रतिक्रिया देताना फ्लॅएडचा लहान भाऊ फिलोनाइसने समाधान व्यक्त करताना आम्ही पुन्हा एकदा श्वास घेत असल्याचे सांगितले.

जॉर्ज फ्लॉईच्या कुटुंबाला मिळणार 196 कोटी

जॉर्जच्या मृत्यू प्रकरणी मिनियापोलिस प्रशासन आणि त्यांच्या कुटुंबीयामध्ये नुकसान भरपाई बाबत सहमती झाली आहे. जॉर्जच्या कुटुंबियांना तब्बल 2.7 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 196 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. तर आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर खटला सुरुच राहणार आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन याच्याकडून निर्णयाचे स्वागत

न्यायालयाच्या या निर्णयाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वागत केले आहे. न्यायालयाचा हा निर्णय जॉर्जला परत तर आणू शकत नाही. हिंसाचार होऊ नये. शांतता निर्माण व्हावी, असे बायडेन यांनी म्हटले आहे.