आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचं एक पाऊल पुढे ! US मध्ये 12 ते 15 वयोगटातील बालकांना Pfizer ची लस मिळणार, FDA च्या मंजुरीची शक्यता

वॉशिग्टन : वृत्तसंस्था –   अमेरिकेत लसीकरणाचा कार्यक्रम युध्दपातळीवर सुरु आहे. येथे 16 वर्षावरील सर्वांना Pfizer ची कोरोना लस देण्याच्या निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यानंतर आता 12 वर्षावरील बालकांना Pfizer ची लस देण्यास एफडीए प्रशासनाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यापासून 12 ते 15 वयोगटातील बालकांना लस देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. महिन्याभरापूर्वीच Pfizer कंपनीने नमूद वयोगटातील बालकांवर लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास केला आहे. त्यात ही लस बालकांवर प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता लसीच्या वापराला या आठवड्यातच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत आतापर्यंत 10.5 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून 14.7 कोटी लोकांना लसीचा किमान एक डोस दिला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक आता विनामास्क घराबाहेर फिरु शकतात. या नागरिकांना छोट्या ग्रुपमध्ये भेटता येईल, परंतु त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असा निर्णय सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन या संस्थेने घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या इस्रायलने देखील असेच पाऊल उचलले होते. त्याठिकाणीही काही नियमांसह विनामास्क घराबाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. इस्रायलमधील सुमारे 60 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे.

Back to top button