Good News : अमेरिकेतील ‘ही’ कंपनी भारताला मोफत देणार 4.5 लाख रेमडेसिवीर

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. या दरम्यान, भारताला मदत करण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच अमेरिकेतील गिलियड सायन्स या औषध कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाची वाढती साथ लक्षात घेऊन कंपनीकडून रेमडेसिवीरच्या किमान 4.5 लाख कुप्या मोफत दिल्या जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कोरोनामुळे भारताची परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोनाचे हे संकट पाहून कंपनीने प्रातिनिधिक पातळीवर तांत्रिक साह्यासाठी परवाना भागीदार उपलब्ध करून देत असल्याचे म्हटले आहे. तसेच स्थानिक उत्पादकांना साह्यभूत ठरतील, अशा सुविधा आणि रेमडेसिव्हिरचे उत्पादन वाढविण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंटचा पुरवठा केला जाणार आहे. गिलियड सायन्सचे मुख्य व्यावसायिक अधिकारी जोहाना मर्सियर यांनी म्हटले की, भारतात कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेची पुरती दमछाक झाली आहे. भारतातील कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी आम्हाला जे काही करता येईल, ते करण्यास कटिबद्ध ते म्हणाले. भारतातील सर्व सात परवानाधारक रेमडेसिवीर उत्पादकांनी उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा वाढवून औषध निर्मिती वाढवल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान भारतातील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आता अमेरिकेतील 40 कंपन्यांच्या सीईओने पुढाकार घेतला आहे. या सीईओंनी एका टास्क फोर्सची स्थापना केली असून त्या माध्यमातून भारताला आवश्यक साधनसामुग्रीची मदत केली जाणार आहे.