ट्रम्प तुमच्या निर्णयामुळे अमेरिकेचेच नुकसान ! अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, टेस्ला झाले नाराज

पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीन कार्ड आणि वर्क व्हिसा स्थगित करण्याच्या निर्णयावर अमेरिकेतील उद्योग क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे. अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, टेस्ला या अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

अमेरिकेत दरवर्षी मोठया प्रमाणावर परदेशी नागरिक नोकरीसाठी येतात. त्यांना एच 1 बी आणि अन्य वर्क व्हिसा जारी केले जातात. तेच व्हिसा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. सतत नावीन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेण्याची अमेरिकेची कल्पकता आणि स्पर्धात्मक वातावरण याला दुहेरी फटका बसेल असा इशारा या आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांनी दिला आहे. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स या रिपब्लिकन पक्षाकडे ओढा असलेल्या संघटनेने सुद्धा व्हिसा स्थगित करण्याच्या निर्णयावर नाराजी प्रगट केली आहे. स्थलांतरितासंबंधीच्या धोरणात बदल केल्यामुळे गुंतवणूक दुसर्‍या देशात जाईल तसेच यामुळे विकास आणि नोकर्‍या दोघांचा वेग मंदावेल असे या संघटनेचे मत आहे.

एच 1 बी व्हिसा स्थगित करण्याच्या निर्णयाकडे टेक इंडस्ट्री कॅनडासाठी एक गिफ्ट म्हणून पाहत आहे. कारण अमेरिकेकडे येणारे उच्च शिक्षित, कुशल मनुष्यबळ आता कॅनडामध्ये जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काही विषयांवर काम करणार्‍या इलॉन मस्क यांनी सुद्धा ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘कुशल परदेशी मनुष्यबळामुळे खरंतर अमेरिकेत नोकर्‍यांची निर्मिती होते. मला सुद्धा हा निर्णय पटलेला नाही’ असे मस्क यांनी म्हटले आहे. व्हिसा स्थगित करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध करताना, काहीजणांनी पुढचा इलॉक मस्क टेस्ला, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांची निर्मिती अमेरिकेत नाही दुसर्‍या ठिकाणी करेल असा इशारा दिला आहे.