भारतीय अभियंत्याला व्हिसा नाकारल्याने अमेरिका सरकारवर खटला दाखल

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – भारतीय अभियंत्याला एच-१बी व्हिसा नाकारल्याबद्दल आयटी कंपनीने अमेरिका सरकारवर खटला दाखल केला आहे. प्रकाशचंद्र साई व्यंकटा अनिसेट्टी असं या अभियंत्याचं नाव असून बी.टेक. पदवीधारक आहेत. त्यांनी डलास येथून टेक्सास विद्यापीठातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

भारतीय अभियंता प्रकाशचंद्र याला एच-१बी व्हिसा नाकारल्यामुळे सिलिकॉन व्हॅलीमधील आयटी कंपनी एक्सटेरा सोल्यूशन्सने अमेरिका सरकारवर खटला दाखल केला आहे. प्रकाशचंद्र यांची एक्सटेरा सोल्यूशन्सने बिझनेस सिस्टिम अनालिस्ट म्हणून कंपनीत नियुक्ती केली होती. मात्र यूएस सिटिझनशीप अ‍ॅण्ड इमिग्रेशन सर्विसेस (यूएससीआयईएस) ने त्यांना एच-१ बी व्हिसा जारी केला नाही. प्रकाशचंद्र साई व्यंकटा अनिसेट्टी हे एच-१बी व्हिसा अंतर्गत काम करण्यास योग्य नाहीत एवढेच अमेरिकन सरकारने कारण देऊन त्यांना व्हिसा दिला नाही. अमेरिकन सरकारने व्हिसा नाकारताना ठोस पुरावे आणि कारणे दिली नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

अमेरिकेत एच-१बी व्हिसावर राहणाऱ्या प्रत्येक चार जणांमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. जवळपास ४ लाखांहून अधिक परदेशी नागरिक या विशेष व्हिसावर अमेरिकेत काम करत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे. एच-१बी व्हिसापैकी जवळपास ७३.९ टक्के व्हिसा हे भारतीयांकडे आहेत. अमेरिकेतील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी ट्रम्प प्रशासनाने एच१ बी१ या व्हिसा प्रकारावर प्रतिबंध आणण्याचे ठरविले होते. मात्र, देशातील कंपन्यांकडून विरोध झाल्याने हा प्रस्ताव बारगळला होता.