10 कोटी नागरिकांना 100 दिवसात ‘कोरोना’ लस, ज्यो बायडन यांची मोठी घोषणा

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन (US President- Joe Biden) यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकेच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येईल, अशी महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. तसेच मास्क वापरणे सर्वांसाठी अनिवार्य करणार असून बहुतांश शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही म्हटले आहे.

जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सहाकोटींचा टप्पा पार केला आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापुढे महासत्ता असलेला अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. येथे एकाच दिवसात कोरोनाचे दोन लाख दहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे.

आपण एक आपत्ती निवारण तज्ज्ञांचे पथक नियुक्त केले असून यातील तज्ज्ञ अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढतील तसेच, आरोग्यसेवा उंचावण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास बायडन व्यक्त केला आहे. फायझर व मॉडर्ना यांच्याशी यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार ट्रम्प प्रशासनाने लशींची खरेदीस सुरुवात करावी. तसेच, अमेरिकी नागरिक व जगभरातील देशांना या लशी पुरवण्यासाठी आवश्यक उत्पादन करण्याचेही या कंपन्यांना सूचित करावे. या प्रकारे कार्यवाही झाल्यास माझ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकी नागरिकांना कोरोनाची लस देणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

WHO च्या प्रमुखांचे कोरोना लसी संदर्भात मोठ विधान
कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरू असून लसीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठे विधान केले आहे. कोणतीही लस कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही असे टेड्रोस यांनी म्हटले आहे. WHO प्रमुखांनी कोरोना लसीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चिंतेत भर पडली आहे. जगात कोरोनावर कोणतीही लस तयार केली गेली तरी ती कोरोना महामारी रोखू शकत नाही असे टेड्रोस यांनी म्हटले आहे. तसेच लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे.