H-1B Visa प्रक्रियेत अमेरिका करणार बदल; आज होणार अंतिम निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अमेरिकेने H-1B व्हिसा प्रक्रियेच्या निवड प्रक्रियेत बदल करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यात सध्या सुरु असलेल्या लॉटरी सिस्टम ऐवजी वेतन आणि कौशल्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील अंतिम नियम आज शुक्रवारी (दि. 8 जानेवारी ) फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित केले जाणार आहे. त्यानंतर 60 दिवसांमध्ये नियम लागू होणार आहेत.

अमेरिकेतील कामगारांच्या आर्थिक हितांचं रक्षण करणे हा यामागील उद्देश आहे. H-1B व्हिसा हा अशाप्रकारचा व्हिसा आहे जो अमेरिकन कंपन्यांना परदेशी कर्मचार्‍यांना विशिष्ट पदांवर ठेवण्याची परवानगी देतो. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या व्हिसाच्या आधारे दरवर्षी हजारो भारतीय आणि चिनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. एचवन बी व्हिसाच्या नियमांमधील बदलांमुळे उच्च वेतन आणि उच्च पदांवर अर्ज करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच कंपन्यांना आपल्या आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणे आणि स्वत:ला जागतिक पातळीवर स्पर्धक म्हणून कायम ठेवण्याचा मार्गही मोठा होणार असल्याचे म्हटले जात आहे.

H-1B व्हिसासाठी अर्ज करण्याचा पुढील टप्पा 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. H-1B व्हिसा योजनेचा काही कंपन्या गैरवापर करत आहेत. ते प्रामुख्याने सुरूवाची पद भरणे आणि आपला खर्च कमी करण्यासाठी याचा वापर करत आहोत, अशी माहिती USCIS चे उपसंचालक (धोरणे) जोसेफ एडलो यांनी दिली आहे.