तब्बल 93 महिलांची हत्या करणार्‍या सिरियल किलरचा तुरुंगात तडफडून मृत्यू

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – 30 वर्षात तब्बल 93 महिलांची हत्या करणारा अमेरिकेतील खतरनाक सीरियल किलर सॅम्युअल लिटील यांचा तुरुंगात तडफडून मृत्यू झाला. सॅम्युअल हा मधुमेह, हृदयरोग व इतर आजारांनी त्रस्त असल्याची माहिती तुरुंग अधिका-याने दिली.

अनेक हत्यांच्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर सॅम्युअल हा 2014 पासून तुरुंगात होता. त्याची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याला कॅलिफोर्नियातील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिथेच त्याला मृत्यूने गाठले. हत्यांप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत त्याने आरोपांचा इन्कार केला होता.पोलिसांनी अनेकदा त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. जवळपास 700 तासांच्या चौकशीनंर त्याने आपल्या दुष्कृत्यांची कबुली दिली. यामध्ये अनेक हत्या प्रकरणांचा उलगडा झाला होता. त्याने 1970 ते 2015 दरम्यान 93 जणांची हत्या केली असल्याची कबुली दिली.

दोषी सॅम्युअल एक चांगला आर्टिस्ट असल्याचेही समोर आले. त्याने हत्या केलेल्या लोकांची रेखाचित्रे बनवून त्यांची माहिती पोलिसांना दिली. त्याशिवाय या हत्या कधी केल्या, कोणत्या वर्षी केल्या आणि मृतदेहांची विल्हेवाट कशी लावली याचीही माहिती त्याने पोलिसांनी दिली. सॅम्युअलने बहुतांशी हत्या या फ्लोरिडा आणि दक्षिण कॅलिफोर्नियात केल्याचे समोर आले.

तर या हत्यांचा तपास अधिका-याने सांगितले की, त्यांनी दिलेली 60 हत्यांची माहिती योग्य असल्याचे आढळून आले. सॅम्युअलने इतरही हत्यांबाबत केलेला दावा चुकीचा नसणार असेही त्यांनी म्हटले होते. सॅम्युअलने हत्या केलेल्या मृतांमध्ये बहुतांशी महिलांचा समावेश होता. यामध्ये देहविक्री करणा-या, अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या गरीब महिलांचा समावेश होता.