हिंसाचारात सहभागी झालेल्यांना शिक्षा होणारच ; महाभियोगाची कारवाई सुरु असतानाच ट्रम्प यांचे महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले….

वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी महाभियोगाची कारवाई करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरु असतानाच ट्रम्प यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये त्यांनी कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला असून त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं असून पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती टाळा असंही म्हटलं आहे. दरम्यान, महाभियोगाची कारवाई होणारे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हिंसाचार मी विश्वास ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीविरोधात तसंच आपल्या चळवळीविरोधात आहे. माझा खरा समर्थक असा राजकीय हिंसाचार करणार नाही. माझा कोणताही समर्थक अशा पद्धतीने कायद्याचा आणि आपल्या ध्वजाचा अपमान करणार नाही. आपल्या नागरिकांना अशा पद्धतीनं धमकावणार नाही. यापैकी तुम्ही काहीही केलं असेल तर तुम्ही चळवळीला पाठिंबा देत नाही आहात. तुम्ही त्यावर हल्ला करत आहात. तुम्ही आपल्या देशावर हल्ला करत आहात आणि हे सहन केलं जाणार नसल्याचंही त्यांनी म्हंटल आहे. कोणतीही माफी, अपवाद नाही. अमेरिकेत कायद्याचं राज्य असून हिंसाचारात सहभागी झालेल्यांना योग्य शिक्षा केली जाईल तसेच कॅपिटॉल हिंसाचारात सहभागी झालेल्यांना शिक्षा होईल असं आश्वासन ही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल आहे.

ट्रम्प यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओतील विशेषबाब म्हणजे या व्हिडिओत त्यांनी महाभियोग कारवाईचा उल्लेखही केला नाही. मात्र यावेळी त्यांनी काही सोशल मीडिया कंपन्यांनी टाकलेल्या बंदीचा उल्लेख केला. हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आपल्या काही लोकांना सेन्सॉर किंवा ब्लॅकलिस्ट करण्याचे प्रयत्न चुकीचे आणि घातक आहेत. सध्या आपण एकमेकांचं ऐकून घेण्याची गरज आहे, एकमेकांना शांत करण्याची नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाबाबत रिपब्लिकन पक्षात मतभेद
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पक्षामध्ये मतभेद झाले. दरम्यान, प्रतिनिधीगृहाने २५ व्या घटना दुरुस्तीनुसार उपाध्यक्षांनी हकालपट्टीची कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे. प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले आहे. याबाबतचा ठराव २२३ विरुद्ध २०५ मतांनी मंजूर झाला असून पक्षीय पातळीवर हे मतदान झाले.

प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असून एका रिपब्लिकन प्रतिनिधीने ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर इतर पाच जण तटस्थ राहिले. याबाबतच्या ठरावात असे म्हटले आहे, की उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी २५ व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ट्रम्प यांना अधिकारपदावरून दूर करावे.यातील २५ वी घटना दुरुस्ती ही पन्नास वर्षांपूर्वी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या खुनानंतर मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार अध्यक्ष जर काम करण्यास सक्षम नसतील तर त्यांच्या जागी उपाध्यक्ष देशाचा कारभार करू शकतात अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार उपाध्यक्ष पेन्स हे मावळते अध्यक्ष ट्रम्प यांना अक्षम ठरवून पदावरून काढून टाकू शकतात. त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पलोसी यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते, की २५ वी घटना दुरुस्ती लागू करून ट्रम्प यांना आपण काढून टाकणार नाही. राज्यघटनेतील २५ वी दुरुस्ती ही अध्यक्षांना शिक्षा करण्याच्या उद्देशाने केलेली नाही, त्यामुळे ट्रम्प यांना काढून टाकण्यासाठी या तरतुदीचा वापर केल्यास चुकीचा पायंडा पडू शकतो.