‘भारत-पाकिस्तान’ तणावाबाबत लवकरच चांगली बातमी , संघर्ष संपण्याची अपेक्षा ‘

हनोई : वृत्तसंस्था  – ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान चांगली बातमी येणार आहे. अमेरिका यात मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे.’ असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सीमेवर असलेला तणाव पाहता ट्रम्प यांनी मोठं आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. व्हिएतनाममधील हनोई येथे ते बोलत होते.

डोनाल्ड ट्रम्प सध्या व्हिएतनाममध्ये आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनसोबत शिखर वार्ता करत आहेत. दरम्यान दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी शिखर वार्ता आहे.

भारत-पाकिस्तान बाबत भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, “माझ्या मते, भारत-पाकिस्तानच्या संघर्षावर चांगली बातमी येणार आहे. दोन्ही देशांमध्ये मागील काही काळापासून तणाव सुरु आहे. आम्ही हे प्रकरण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत आहोत. आम्हाला चांगली बातमी मिळत आहे. दशकांपासून सुरु असलेला तणाव लवकरच संपेल, अशी अपेक्षा आहे.”

दरम्यान 14 फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. यावेळी या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला होता. यावेळी पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी असा सल्लाही अमेरिकेने पाकिस्तानला दिला होता. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, ” भारताने आपले अनेक सैनिक गमावले आहेत, त्यामुळे तो मोठे काहीही करु शकतो.”

यानंतर भारताने 12 दिवसांनंतर पाकिस्तानी हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. यावेळी भारताने जैश-ए-मोहम्मदची अतिरेकी तळं उद्ध्वस्त केली होती. यानंतर पाकिस्तानच्या वायूसेनेने बुधवारी भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन केलं होतं. मात्र भारतीय वायूसेनेने त्वरित कारवाई करत पाकिस्तानी विमानांना पळवून लावलं आणि F16 विमान पाडलं. यादरम्यान भारताच्या MIG 16 विमानाच्या वैमानिकाला पाकिस्तानने ताब्यात घेतलं.