TikTok वर बंदी घालणार्‍या आदेशावर ट्रम्प यांची ‘स्वाक्षरी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घातली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता टिकटॉक आणि वी-चॅट या कंपन्यांसोबत करण्यात येणार्‍या व्यवहारांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या हा व्यवसाय खरेदी न करण्याच्या शक्यतेकडे पाहता त्यांनी देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत दिली आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीदेखील केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी अ‍ॅप टिकटॉक आणि वी-चॅटवर 45 दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यापूर्वी सीनेटने अमेरिकेतील कर्मचार्‍यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणार्‍या आदेशाला मान्यता दिली होती. टिकटॉकसारख्या अविश्वासू अ‍ॅपद्वारे डेटा जमवला जाणे हे देशाच्या सुरक्षेविरोधात आहे, असे ट्रम्प आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर म्हणाले.

डेटा मिळवल्यामुळे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकेतील लोकांच्या खासगी आणि मालकीची माहिती मिळते. यामुळे चीन अमेरिकेतील फेडरल कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या ठिकाणांचा मागोवा घेऊ शकते. त्याशिवाय कम्युनिस्ट पक्ष खासगी माहितीचा वापर करून धोका निर्माण करू शकतो आणि कॉर्पोरेट हेरगिरीदेखील करू शकतो, असेही ट्रम्प म्हणाले