राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्ली हिंसाचार आणि CAA बद्दल केलं मोठं विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर असताना दिल्लीमध्ये हिंसाचार भडकला आहे. सीएए वरून सुरु असलेल्या हिंसाचारावर ट्रम्प यांना पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, सीएए हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. तसंच दिल्लीतील हिंसाचाराबाबत मोदींशी कुठलीही चर्चा झालेली नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

ट्रम्प म्हणाले, दिल्लीतील हिंसाचाराबाबत ऐकले पण याप्रकरणी मोदींशी चर्चा झाली नाही. सीएएवर आपण बोलणार नाही कारण हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. अपेक्षा आहे भारत योग्य पाऊल उचलेल आणि योग्य निर्णय घेईल. आम्ही मोदींशी धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा केली. धार्मिक स्वातंत्र्य मिळावे, अशीच मोदींची इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. भारताने धार्मिक स्वातंत्र्यावर मोठं काम केलं आहे. नागरिकांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित आहे. भारतात वीस कोटी मुस्लिम आहे. काही वर्षापूर्वी ती चौदा कोटी होती. आम्ही मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन काम करत असल्याचे मोदींनी सांगितले असे ट्रम्प म्हणाले.

दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत 10 जणांनी जीव गमावला आहे. अपुऱ्या सुरक्षेमुळे हिंसाचार वाढला असे दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाला काल दिलेल्या अहवालात म्हटलंय. तसेच गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतही पुरेसे पोलीस बळ नसल्याचं कारण देण्यात आलं होतं.