किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘सूचक’ विधान, म्हणाले – ‘माझ्याकडे सगळी माहिती पण…’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल सध्या अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल योग्य माहिती असल्याचे म्हटले आहे. सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, मी तुम्हाला नेमके सांगू शकत नाही. पण हो माझ्याकडे योग्य माहिती आहे. पण मी त्याबद्दल बोलू शकत नाही. मी फक्त ते लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा देतो.

किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल सध्या वेगवेगळे दावे केले जात आहेत. 15 एप्रिल रोजी आजोबांच्या जयंतीला किम जोंग अनुपस्थित राहिल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली होती. किम जोंग यांनी 2011 मध्ये सत्ता हाती घेतल्यापासून कधीही कार्यक्रम चुकवलेला नाही. अनेकांनी तर किम जोंग यांचा मृत्यू झाल्याचाही दावा केला आहे. काही रिपोर्ट्सनुसार किम जोंग यांची हार्ट सर्जरी झाली असून तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळली असल्याचा दावा केला आहे. मात्र याबाबत उत्तर कोरियाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे दक्षिण कोरियाने किम जोंग जिवंत असून त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याचे म्हटले आहे.

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला किम जोंग यांच्या प्रकृतीची योग्य माहिती असल्याचे नमूद केले आहे. माझे किम जोंग यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. मी जर राष्ट्राध्यक्ष नसते तर आज तुम्ही उत्तर कोरियासोबत युद्ध लढत असता. हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो. त्यांना युद्धाची अपेक्षा होती. त्यांची प्रकृती चांगली असावी अशी अपेक्षा आहे. पण खरे सांगायचे तर ते कसे आहेत याची मला कल्पना आहे. लवकरच तुम्हालाही याची माहिती मिळेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.