अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ‘ट्रम्प’ यांना पाठवण्यात आला ‘विषारी’ लिफाफा, सुरक्षा एजन्सींनी पकडलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरूद्ध मोठा कट रचला गेला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विषाचा एक लिफाफा पाठविण्यात आला जो वेळीच सुरक्षा यंत्रणांनी पकडला. हा लिफाफा कॅनडाहून पाठविला गेला असल्याचे म्हटले जात आहे. जेव्हा सुरक्षा यंत्रणांना हा लिफाफा संशयास्पद वाटला तेव्हा चौकशी करण्यात आली, तर त्यामध्ये रिसिन नावाचा एक विषारी पदार्थ सापडला.

व्हाईट हाऊसमध्ये येण्यापूर्वी सर्व लिफाफे व्यवस्थितरीत्या तपासले जातात. त्याच वेळी संशयास्पद पॅकेटची तपासणी केली असता त्यात रिसिन हा विषारी पदार्थ सापडला. याची पुष्टी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी पॅकेजची पुन्हा तपासणी केली. पुन्हा तपासणीत रिसिन विषारी पदार्थाची पुष्टी झाली, त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी पुढील तपास सुरू केला. आतापर्यंतच्या तपासात असे आढळले आहे की हा लिफाफा कॅनडाहून अध्यक्ष ट्रम्प यांना पाठविण्यात आला होता.

रिसिन हा अत्यंत विषारी पदार्थ आहे जो दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापरला गेला आहे. याचा उपयोग पावडर, धुकं, टॅबलेट किंवा अ‍ॅसिडच्या स्वरूपात केला जातो. या विषारी पदार्थामुळे पोट आणि आतड्यांमधून रक्तस्त्राव होतो. या विषामुळे लिव्हर, स्पलीन आणि किडनी निकामी होते आणि बाधित व्यक्तीचा मृत्यू होतो. एफबीआय आणि सिक्रेट सर्व्हिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.