PM मोदी माझे चांगले मित्र, पण अत्यंत ‘कडक’ अन् ‘शिस्तप्रिय’, मोटेरा स्टेडियमवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियमवरुन पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतूक केले. ट्रम्प यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीतून नमस्ते म्हणत केली. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, भारतात प्रत्येक जण पंतप्रधान मोदींवर प्रेम करतात. त्यांना फक्त गुजरातमध्येच नाही तर देशभरात पसंत केलं जातं आणि ते भारताचा मान आहेत. त्यांच्या योजनेमुळे भारतात प्रत्येक मिनिटाला 12 लोक गरिबी रेषेच्या बाहेर येत आहेत.
यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी भारतात सुरु केलेल्या योजनांचे कौतूक केले. ट्रम्प म्हणाले की अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे, भारताची इज्जत करते आणि अमेरिका कायम भारताचा निष्ठावान मित्र राहिल.
ते म्हणाले की, मोटेरा स्टेडियम खूप छान आहे. मी 8000 किलोमीटरचा प्रवास करुन हे सांगायला आलोय की अमेरिका भारतावर प्रेम करते, भारत एक सहनशील देश आहे आणि पीएम मोदी चॅंपियन आहेत.
ट्रम्प म्हणाले, पीएम मोदी राजकारणात येण्यापूर्वी चहा विकत होते, प्रत्येक जण त्यांना पसंत करतो, परंतु हे अत्यंत अवघड काम आहे आणि ते शिस्तप्रिय आहेत. आज पीएम मोदी भारतातील सर्वात प्रमुख नेते आहेत. मागील वर्षी 60 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पीएम मोदींना मतदान केले आणि सर्वात मोठा विजय मिळवून दिला. ते म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वात लोक गरिबीतून बाहेर येत आहेत, अनेक लोक आता गॅसवर जेवण तयार करत आहेत, त्यांच्या नेतृत्वात भारत वेगाने पुढे जात आहे.