बगदाद : US दुतावासवर पुन्हा रॉकेट हल्ला, अमेरिकेने केली भारताशी चर्चा

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष थांबविण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत. युरोपियन युनियन आणि भारतासह अनेक आंतरराष्ट्रीय संघटना दोन्ही देशांना संयम पाळण्याचे आवाहन करत आहेत, परंतु, तणाव कमी होताना दिसत नाही. ताज्या वृत्तानुसार बगदादमधील अमेरिकन दूतावासाजवळ पुन्हा एकदा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात झालेल्या नुकसानाबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, अमेरिका जगभरात मोर्चेबांधणी करण्याचे प्रयत्न करत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा करून इराणी जनरल कासिम सुलेमानीशी संबंधीत निर्णयाची माहिती भारताला दिली. यासह दोन्ही देशात पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावावर सुद्धा चर्चा केली.

अमेरिकेच्या दूतावासाजवळ रॉकेट हल्ला

बगदादमधील ग्रीन झोनमध्ये लागोपाठ दुसर्‍या दिवशी मोठे स्फोट झाले. येथे अमेरिकेच्या दूतावासावळ दोन रॉकट येऊन पडले. या हल्ल्यात आतापर्यंत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. शनिवारी रात्रीसुद्धा अमेरिकेच्या दुतावासाजवळ रॉकेट हल्ला करण्यात आला होता. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ग्रीन झोनच्या बाहेर एक तिसरे रॉकेटसुद्धा पडले आहे, ज्यामध्ये एका कुटुंबाचे नुकसान झाले आहे. यामध्ये 4 लोक जखमी झाले आहेत. ग्रीन झोनच्या जवळ जमिनीवरील तसेच हवाई सुरक्षा अतिउच्च दर्जाची आहे.

दोन्ही देशांच्या युद्ध-नीतिमुळे भारत चिंतेत

इराण आणि अमेरिकेमधील ताणावाने भारताची चिंता वाढवली आहे. दोन्ही देश भारताचे सामरिक आणि व्यापारी भागिदार आहेत. भारताने दोन्ही देशांना तणाव दूर करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, माईक पोम्पियो यांनी केलेल्या ट्विटमधील भाषा आक्रमक आणि भडकाऊ दिसत आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ट्विट केले की, डॉ. एस जयशंकर आणि मी आत्ताच चर्चा केली आहे, आम्ही इराणकडून सतत दिल्या जाणार्‍या धमक्या आणि त्यांच्या चिथावणीखोर कारवायांवर चर्चा केली आहे. ट्रम्प प्रशासन हे अमेरिकन लोक, आमचे मित्र आणि सहकार्‍यांच्या रक्षणासाठी अजिबात मागेपुढे पाहणार नाही.

तर माईक पोम्पियो यांच्याशी चर्चा केल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की, भारताने अमेरिकेसमोर आपले हित आणि चिंता मांडल्या आहेत. त्यांनी ट्विट केले की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांच्याशी खाडी क्षेत्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली. आम्ही भारताच्या चिंता आणि हितासंबंधी त्यांना सांगितले.

पश्चिम आशियातील स्थितीवर भारताचे लक्ष

पश्चिम आशियाच्या स्थितीवर भारत सतत लक्ष ठेवून आहे. सुत्रांनी सांगितले की, भारत दोन्ही बाजूशी सध्यस्थितीवर चर्चा करत आहे, कारण या क्षेत्रातील सुरक्षितता आणि स्थिरतेमध्ये भारताला स्वारस्य आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जरीफ यांच्याशी सध्यस्थितीवर फोनवर चर्चा केली आहे. दोन्ही देशांना स्थितीची जाणीव करून दिली आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, भारत तणावाच्या या स्थितीमुळे खुप चिंताग्रस्त आहे. दोन्ही देश एकमेकांशी सतत संपर्कात राहण्याबाबतही सहमत झाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/