48 तास देखील टिकू शकला नाही अफगाण शांती करार, तालिबाननं पुन्हा केला हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अविश्वास, शंका आणि अर्धवट योजनांसह करण्यात आलेला अफगाण शांतता करार दोन दिवसांपर्यंत देखील अफगाणांना शांतता प्रदान करू शकला नाही. अमेरिका आणि तालिबानमध्ये अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा शांतता करार तेव्हा जवळजवळ संपला होता जेव्हा पूर्वेकडील अफगाणिस्तानातल्या खोस्त शहराच्या फुटबॉल मैदानात स्फोट झाला. या स्फोटात तीन लोक ठार झाले आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

कतारची राजधानी दोहा मध्ये २९ फेब्रुवारीला अमेरिका आणि कतार ने एक ऐतिहासिक करार केला होता. त्याअंतर्गत सर्व बाजूंनी युद्धबंदी होणार होती. पण २ मार्च रोजी तालिबानने युद्धबंदीचा हा करार तोडला आणि ४८ तासाच्या आत खोस्त मध्ये स्फोट झाला.

तालिबानचे प्रवक्ते जबीहउल्ला मुजाहिद म्हणाले की, हिंसाचार कमी करण्यासाठी निश्चित केलेला वेळ आता संपलेला आहे. अमेरिका-तालिबान कराराअंतर्गत आमचे मुजाहिद्दीन परदेशी सैन्यांवर हल्ला करणार नाहीत. परंतु अफगाण सरकारवर आमचा हल्ला सुरू राहील.

का तुटला शांततेचा करार

अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या शांतता करारामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की तालिबान आपल्या ताब्यातून एक हजार अफगाण सैनिकांची सुटका करेल आणि अफगाण सरकार पाच हजार तालिबानी कैद्यांची सुटका करेल. परंतु, अफगाणचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी रविवारी सांगितले की ते याबाबत आश्वासन देऊ शकत नाहीत की तालिबान कैद्यांची सुटका करण्यात येईल. ते म्हणाले की हे अमेरिका नव्हे तर अफगाणिस्तानातील लोक ठरवतील की कोणाला सोडवायचे आणि कोणाला नाही.

अशरफ गनी यांच्या घोषणेने बिथरले तालिबान

राष्ट्रपती अशरफ गनी यांनी केलेल्या घोषणेने तालिबानी बिथरले आहेत. यानंतर खोस्त मध्ये स्फोट देखील झाला. वास्तविक पाहता तालिबानांना अफगाण सरकारकडून त्यांच्या सेनानींची सुटका करून घ्यायची आहे. यासाठी तालिबान अमेरिका आणि सध्याच्या अफगाणिस्तानच्या सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबानचं म्हणणे आहे की कैद्यांच्या सुटकेशिवाय शांततेची चर्चा होणार नाही. १० मार्चपर्यंत अशरफ गनी सरकारने ५,००० तालिबानी कैद्यांना सोडायला हवे अशी तालिबान्यांची इच्छा आहे. यानंतर शांतता चर्चेचा पुढील टप्पा सुरू होईल.