अमेरिका तालिबान शांती करारानं भारताची ‘डोकेदुखी’ वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि तालिबान यांच्यात ऐतिहासिक शांती करार झाला आहे. दोहा येथे या करारावर स्वाक्षरी झाली आहे. पुढील १४ महिन्यांत अमेरिका आपले सर्व सैनिक अफगाणिस्तानातून माघारी बोलविणार आहे. गेली १८ वर्षे सुरु असलेल्या युद्धाला पूर्ण विराम मिळाला आहे. मात्र, अमेरिका आणि तालिबान यांच्यातील शांती कराराने भारताच्या समस्या वाढणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारत दौर्‍यात तालिबानबरोबरील शांती कराराचा उल्लेख केला होता. त्याला भारताने सहमती दर्शविली होती. मात्र, या करारामुळे भारतापुढील समस्या वाढणार आहेत. भारताचा परदेशी सहायता कार्यक्रमात अफगाणिस्तानचा मोठा वाटा आहे. अफगाणिस्तानातील विकासात भारतातील अनेक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कामे मिळाली आहेत. त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानमध्ये सध्या असंख्य तालिबानी अतिरेकी अडकून पडले आहेत. अमेरिकेबरोबर समझौता झाल्याने त्यांना दुसरे काही काम द्यावे लागणार आहे. पाकिस्तानच्या मदतीने तालिबान या अतिरेक्यांचा भारतात विशेषत: काश्मीरमध्ये वापर करण्याचा शक्यता आहे. त्यामुळे भारतासाठी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

३७० कलम हटविल्यानंतर आता गेल्या ६ महिन्यात काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. या करारानंतर जर तालिबानने काश्मीरकडे लक्ष वळविले तर त्याचा सर्वाधिक त्रास भारताला होऊ शकतो.