चिंताजनक ! अमेरिकेकडून भारताला मिळणारी ‘ही’ सुविधा होणार रद्द

वॉश्गिंटन : वृत्तसंस्था – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीची व्यापार संधी (GSP) बंद केली असून विशेष व्यापारी सूट देणारा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिका GSP अंर्तगत विकसनशील देशांना आपल्या बाजारपेठेत आयातकर आकारत नाही. अमेरिकेने भारताला GSP चा दर्जा काढून काढून घेण्याबद्दल नोटीस दिलेली आहे मात्र अद्याप यावर अंतिम निर्णय बाकी आहे.

अमेरिकेच्या GSP योजनेचा भारत सर्वात मोठा लाभार्थी आहे. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी किंवा व्हाईट हाऊस यांच्याकडून अद्याप भारताच्या GSP बद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र याबाबत कधीही निर्णय होऊ शकतो. ४ मार्च रोजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे जाहीर केले, की भारताबरोबरची ही योजना आम्ही बंद करणार असून यापुढे भारताला त्याचा लाभ मिळू देणार नाही. अमेरिकी वस्तूंना भारतात समान संधी देण्याचे वचन भारताने दिलेले नाही, त्यामुळे भारताचा GSP लाभ काढून घेण्यात येत आहे असे ट्रम्प यांचे म्हणणे असले तरी हे लाभ काढून घेण्यात कुणाचेच हित नाही, असे अमेरिकी काँग्रेस सदस्यांचे म्हणणे आहे. GSP कार्यक्रम थांबविल्यास भारतात निर्यात व्यापार वाढवू पाहणा-या कंपन्यांना फटका बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

GSP म्हणजे काय –

जनरलाईज्ड सिस्टिम ऑफ प्रीफेन्स (GSP) हा अमेरिकेचा मोठा आणि जुना सामान्यीकृत व्यापार प्राधान्य कार्यक्रम आहे. निवडक लाभार्थी देशांच्या हजारो उत्पादनांना विनाशुल्क प्रवेश देत आर्थिक विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे संबंधित देशांच्या हजारो वस्तू कुठलाही कर लागू न करता अमेरिकेत येत असतात. ही योजना विकसनशील देशांसाठी लागू केली होती.

भारताचे होणार नुकसान –

जीएसपी अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती. अमेरिकेच्या जीएसपी योजनेचा भारत सर्वात मोठा लाभार्थी होता. जीएसपी कार्यक्रमात लाभार्थी विकसनशील देश म्हणून भारताला देण्यात आलेला दर्जा रद्द करण्याचा अमेरिकेचा इरादा आहे. यानुसार १९७० पासून भारताला ५.६ अब्ज डॉलर्स म्हणजेच ४० हजार कोटी रुपयांच्या निर्यातीवर सूट मिळत होती. आता जीएसपीतून बाहेर केल्यानंतर भारताला हा फायदा मिळणार नाही.