अमेरिकेचा WHO ला पुन्हा ‘इशारा’ ! करणार सदस्यत्वचा त्याग, निधी कायमस्वरुपी बंद

वॉशिंग्टन : वृत्त संस्था  – जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यु एच ओ) अमेरिकेने केलेल्या मागण्यांबाबत येत्या ३० दिवसात योग्य ती पावले न उचलल्यास अमेरिका आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वाचा त्याग करेल. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी कायमस्वरुपी बंद केला जाईल, असा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातील बाहुले झाले असल्याची टिकाही अमेरिकेने केली आहे.

अमेरिकेने २०१८-१९ मधे जागतिक आरोग्य संघटनेला तब्बल ४०० दशलक्ष डॉलरचा निधी दिली होता. ही रक्कम जागतिक आरोग्य संघटनेच्या एकूण निधी पैकी तब्बल १५ टक्के इतकी आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस घेब्रेयेसुस यांना पत्र पाठवित जागतिक आरोग्य संघटना कोरोना बाबत राबवित असलेल्या उपाय योजनांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य संघटनेने सातत्याने चुकीची पावले उचलल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेची पुर्नरचना करण्याची मागणी केली असून, त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याची सूचनाही केली आहे. आरोग्य संघटना रोगाचा प्रसाराची धोक्याची घंटा बजावण्यात अपयशी ठरले.

तसेच, त्यांनी चीनने दिलेल्या खोट्या आकडेवारीवर विश्वास ठेवला. जागतिक आरोग्य संघटनेने चीनने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवत मानवी प्रसार न झाल्यावर विश्वास ठेवला.  जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक घेब्रेयेसूस यांनी कोरोनाचा स्वतंत्रपणे तपास केला जाईल, असे सांगितले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी देखील तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रसार झाला असून आतापर्यंत १५ लाख लोकांना त्याची लागण झाली आहे़ जगातील सर्वाधिक ९३ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांचा अमेरिकेत मृत्यु झाला आहे.