अमेरिकेत 15 सप्टेंबर नंतर TikTok वर बंदी ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारताने बंदी घातलेल्या टिकटॉकला आता अमेरिकेतही व्यवसाय गुंडाळावा लागणार आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीने 15 सप्टेंबरपर्यंत विकत घेतला नाही, तर त्यानंतर टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घातली जाईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

भारतातही टिकटॉक अ‍ॅप प्रचंड लोकप्रिय होते. पण गलवान खोर्‍यातील रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने देशात व्यवसाय करणार्‍या चिनी कंपन्यांना जोरदार दणका दिला. यामध्ये टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. भारताने टिकटॉकवर बंदीची कारवाई केल्यानंतर अमेरिकेतही प्रतिनिधी सभागृहाच्या काही सदस्यांनी टिकटॉकवर अशीच कारवाई करण्याची मागणी केली होती.

अमेरिकेत सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट’ला टिकटॉकच्या खरेदीमध्ये रस आहे. त्यासाठी त्यांची बाइटडान्स कंपनीबरोबर बोलणी सुरु आहे. बाइटडान्सकडे टिकटॉकची मूळ मालकी आहे. टिकटॉक अ‍ॅपचा 30 टक्के नाही तर 100 टक्के व्यवसाय खरेदी करावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे. या विषयासंदर्भात आपण मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासोबत चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like