Pune News : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष निवडणुकीत पुण्यातील तरुणीचा डंका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षाची निवडणूक कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरत असते. यांदाच्या निवडणुकीत पुण्यातील एका तरुणीने मुख्य भूमिका पार पाडली. वैदेही रेड्डी असे या मुलीचे नाव आहे. अमेरिकेतील स्त्रियांमध्ये राष्ट्रध्यक्ष निवडणूकीबद्दल जागृती करण्यासाठी ‘थिंक वूमन’ या संस्थेकडून एक मोहीम राबवली होती. यामध्ये बोधचिन्ह म्हणून वैदेहीने काढलेल्या चित्रकृतीचा वापर करण्यात आला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत मेरिलँण्ड राज्यातील ‘थिंक वूनम’ या संस्थेने निवडणुकीबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी एक मोहीम हाती घेतली होती. यामध्ये प्रमुख बोधचिन्ह म्हणून पुण्यातील वैदेही रेड्डी हिने रेखाटलेल्या चित्राचा वापर करण्यात आला. या चित्रकृतीचा वापर त्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन मोहिमेसाठी केला होता. निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त महिलांनी मतदान करावे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती.

पुण्याच्या वैदेही हिच्या या चित्रकृतीमध्ये स्त्रीचे चित्रण असून ते सध्याच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आहे. याशिवाय ही कलाकृती या शतकातील स्त्री च्या प्रेरणा, विचार व स्वप्न दर्शवते. म्हणूनच वैदेहीच्या चित्रकृतीची निवड ‘थिंक वूमन’ या संस्थेने केली होती. वैदेहीने या चित्राची निर्मिती 2018 मध्ये केली होती. ही चित्रकृती ऍबस्ट्रँक्ट कंटेम्पररी स्टाइल या प्रकारात मोडते. यापूर्वी वैदेहीने 2014 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील गुगल डूडल स्पर्धा जिंकली होती. तिचे शालेय शिक्षण पुण्यातील आर्मी स्कूलमध्ये झाले असून तिचे वडील भारतीय लष्करात कार्यरत आहेत.