सरकारी नोकरीच्या परीक्षेत डमी परीक्षार्थीं बसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 पोलिसांचा समावेश

नोएडा (उत्तर प्रदेश): पोलिसनामा ऑनलाईन – सरकारी खात्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत डमी परीक्षार्थीं बसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दिल्ली पोलिसांनी केला आहे.

याबाबत माहिती देताना अपर पोलीस आयुक्त (कायदा-व्यवस्था) लवकुमार यांनी सांगितले की, सेक्टर ६२ मध्ये पोलीस भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा सुरू असून, त्यामध्ये परीक्षार्थींच्या जागी त्यांचे ओळखपत्र लावून दुसरेच कोणीतरी परीक्षा देत आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांचे आणखी सहा साथीदार बाहेर उभे असल्याची माहिती त्यांनी दिली. यात दिल्ली पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली.

या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. या टोळीमध्ये प्राप्तिकर आणि गृहखात्यातील लोंकांचाही समावेश असल्याचे समोर आले. आरोपींची दिलेल्या माहितीनुसार, दिनेश जोगी व प्राप्तिकर खात्यातील त्याचे निरीक्षक मामा रवीकुमार व गृहमंत्रालयातील त्याचे साथीदार अरविंद ऊर्फ नॅन हे मिळून एक टोळी चालवीत आहेत. सध्या संरक्षण मंत्रालयात एएसओ या पदावरील नोकरी मिळविण्यासाठी दिनेशने दुसऱ्याच कुणाला तरी बसवून नोकरी मिळविली. आगामी काही दिवसांत तो नोकरीवर रुजू होणार आहे. या टोळीतील दिल्ली पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबलचे काम या टोळीला प्रश्नपत्रिका सोडवून देणारा उपलब्ध करून देण्याचे आहे. आतापर्यंत या टोळीने १०० पेक्षा अधिक लोकांना फसवणुकीद्वारे इतर खात्यांमध्ये नोकरी मिळवून दिली आहे.

लाखो रुपयांची कमाई
या टोळीचे अनेक कारनामे समोर येत असून सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली युवकांकडून ही टोळी १० लाखांपासून २० लाखांपर्यंत रक्कम उकळत होते. अटक केलेल्यांकडून एकूण २,१०,००० रुपये रोख, अनेक मोबाईल, तीन आलिशान कार, दिल्ली पोलिसांचे दोन गणवेश व बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या टोळीचा म्होरक्या रवीकुमार व गृहमंत्रालयातील अरविंद हे फरार आहेत. असे, अपर पोलीस आयुक्त लवकुमार यांनी सांगितले.