मुंबईमध्ये ड्रग्जच्या तस्करीसाठी केला जातोय लहान मुलांचा वापर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लहान मुलांना ड्रग्जच्या आहारी ढकलून नंतर त्यांच्याकडून ड्रग्जची तस्करी केली जात धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केलेल्या धडक कारवाईपासून वाचण्यासाठी आता ही नवीन पद्धत तस्करांकडून वापरली जात आहे. तसेच ‘कोडीन’ नावाच्या ड्रग्जचा सप्लाय मोठ्या प्रमाणात मुंबईत वाढला आहे.

ज्या लहान मुलांच्या हातात खेळणे असायला हवे, त्या लहान मुलांचा मुंबईत ड्रग्ज तस्करीसाठी वापर केला जात आहे. फक्त लहान मुलेच नाहीतर दिव्यांग आणि क्षयरोगी (TB) रुग्णांकडूनही ड्रग्जची तस्करी करण्यात येत आहे. ‘कोडीन’ नावाचे ड्रग्जचा सप्लाय लहान मुलांकडून केला जात आहे.

ड्रग्ज सप्लाय करण्यात येणारी लहान मुले धारावी, कुर्ला, वडाळा, अँटॉपहिल येथील झोपडपट्टी परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. NCB ने कुर्ल्यातून अटक केलेला सराईत गुन्हेगार बबलू पट्री हा लहान मुलांकडून ड्रग्ज तस्करी करायचा. तत्पूर्वीही, बबलु पट्री ला गंभीर गुन्ह्यांत अटक केली होती, तर काही गुन्हांसाठी पोलीस त्याचा तपास करत होते. तसेच सिराज अहमद आणि मोहम्मद सत्ता यांच्याकडून ४० किलो ‘कोडीन’ जप्त करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

ड्रग्ज तस्करीसाठी लहान मुलांना २०० ते ३०० रुपये दिले जातात. काही समाजसेवी संस्था नशाबंदीसाठी काम करतात, पण त्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. पालकांनी त्यांच्या मुलांकडे आणि त्यांच्या वागणुकीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नशाबंदी मंडळाच्या वर्षा विद्याविलास यांनी म्हटले.