बीडमध्ये उदयनराजेंच्या नावाचा वापर करून दिशाभूल ? ; राजेंनी काढलेले पत्रक सोशल मीडियावर व्हायरल

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रितम मुंडे यांची काल भेट घेतली होती. यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांचा प्रितम मुंडे यांना पाठींबा असल्याचे सांगितले आणि मतदारांना देखील आवाहन केले. बीड जिल्ह्यातील श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठाननेही प्रितम मुंडेंना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रक काढून आपला कोणत्याही भाजपा-सेना उमेदवारास पाठिंबा नसल्याचे म्हटले आहे.

बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांना प्रचारासाठी बोलविले. त्यामुळे पंकजा यांनी मराठा मतांसाठी प्रचारात संभाजी राजेच्या रुपाने मराठा कार्ड वापरल्याची चर्चा बीडमध्ये रंगत आहे. मुंडे कुटुंबीयांचे आणि आमचे अनेक दिवसांचे संबंध आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी मृत्युपूर्वी गरज पडल्यास आपल्या मुलींच्या पाठिशी उभे रहा असे सांगितले होते. त्यामुळे प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी परळीत आल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले होते.

संभाजीराजेंच्या भेटीनंतर उदयनराजेंचाही प्रितम यांना पाठिंबा मिळाल्याची चर्चा होती. मात्र, उदयनराजेंनी एक पत्रक काढून ही चर्चा खोटी ठरवली आहे. बीड मतदारसंघात माझ्या नावाचा वापर करुन दिशाभूल करण्यात येत असल्याचे उदयनराजेंनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. राज्यातील मतदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीला मतदान करावे असेही राजेंनी पत्रकात म्हटले आहे. राजेंनी काढलेले पत्रक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे