महिलांच्या स्वच्छतागृहासाठी पुण्यात ‘पिंक ती’ ; पुणे महापालिकेचा अनोखा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील महिलांना नोकरी शिक्षण आणि इतर कारणासाठी दररोज प्रवास करावा लागतो. पण शहरात महिलांच्यासाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांची संख्या कमीच आहे. जी स्वच्छतागृहे आहेत त्यांच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडलेल्या महिलांची मोठी कुचंबणा होते आहे. पण पुणे महानगरपालिकेने यावर तोडगा काढला आहे.
टाकाऊपासून टिकाऊ
महापालिका आणि सारा प्लास्ट या कंपनीने एकत्र येत वापरातून बाद झालेल्या जुन्या पीएमपी बसचा वापर करून लेडीज टॉयलेटची निर्मीती केली आहे. या बसमध्ये वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही प्रकराचे टॉयलेट तयार करण्यात आली आहेत. या स्वच्छता गृहाच्या वापरासाठी फक्त ५ रूपये द्यावे लागणार आहेत. या टॉयलेटला ‘ती’ हे नाव देण्यात आले आहे.

भंगारात निघालेल्या गाड्यांचा वापर करून बेघर नागरिकांसाठी घरे तयार केल्याचे आम्ही वाचले होते. यावरून आम्हाला ही कल्पना सुचली. ही कल्पना आम्ही तत्कालीन महापालिका आयुक्त यांच्यासमोर मांडली आणि त्यांनीसुद्धा याला होकार दिला. अशाप्रकारे ही पिंक बस अस्तित्वात आली. अशी माहिती उल्का सदळकर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली. ही बस सौरऊर्जेवर चालते. प्रत्येक बसच्या देखभालीसाठी एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी या बसमध्ये टीव्ही देखील लावण्यात आले आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणी अशा १२ बसेस असून या बसेसला महिलांचा प्रतिसादही चांगला मिळताना दिसत आहे.

निकामी झाल्यामुळे भंगारात काढाव्या लागणाऱ्या पीएमपी बसेसची संख्याही लक्षणीय आहे. तर दुसऱ्या बाजूला महिलांसाठीच्या स्वच्छतागृहाची संख्या नगण्य आहे. यामुळे अशा प्रकारच्या पिंक बसेस तयार करण्यासाठी मोठा वाव आहे. यामुळे पीएमपीने प्रवास करणाऱ्यांच्या समस्या जरी कमी होणार नसल्या तरी या बसचा वापर स्वच्छतेसाठी होऊ शकतो, हे या प्रयोगाच्या माध्यमातून समोर आले आहे.