एकावे ते नवलच ! जमिनीचा ताबा घेण्यासाठी चक्क १० ते १५ तृतीयपंथींचा वापर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भावा भावात वाद आणि तेही जमिनीवरुन असेल तर अगदी खून पाडण्यापर्यंत प्रकरण जाते. काही जण आपल्या पदाचा उपयोग करुन थेट लष्करातील आपल्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिक, गाड्यांचा वापर करुन जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतात. पण आळंदीजवळील मरकळ येथे वेगळाच प्रकार घडला. आपल्या भाविकीतील जमिनीचा ताबा घेण्यासाठी त्यांनी चक्क १० ते १५ तृतीयपंथींचा वापर केला.  या १० ते १५ तृतीयपंथीयांना आणून त्यांनी ऊस, ज्वारी, मकाच्या पिकाचे नुकसान करुन भिती घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आनंदा बारुक लोखंडे, शुभम मुकेश लोखंडे, अविनाश मुकेश लोखंडे, लता मुकेश लोखंडे, रवि लक्ष्मण लांडगे (रा. धावडे वस्ती, भोसरी), नियती शिंदे (रा. आळंदी) यांच्यासह ४० ते ५० अनोळखी तसेच १० ते १५ तृतीयपंथी स्त्रियांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संतोष काळुराम लोखंडे (वय ३९, रा. कमळजाई वस्ती, मरकळ, ता. खेड) यांनी आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, लोखंडे यांचे मरकळ गावाच्या हद्दीत जमीन आहे. त्यांच्या शेत जमिनीत ऊस, ज्वारी व मक्याचे पीक असताना आनंदा लोखंडे व त्याचे नातेवाईक, इतर आणि १० ते १५ तृतीयपंथीयांना घेऊन ते शेतात आले. त्यांनी शेतामध्ये जेसीबी घालून उभ्या असलेल्या पिकावर तो जेसीबी चालविला. त्यामुळे पिकाचे अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर त्यांनी बरोबर आणलेल्या लोकांच्या मदतीने शेतामध्ये सिमेंटची भिंत घालून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट समजताच संतोष लोखंडे व त्याची पत्नी, आई, भाऊ, वहिनी, पुतण्या हे तातडीने शेतात गेले. त्यांनी त्यांना जमिनीत सिमेंटची भिंत घालू नका असे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यातील ४ ते ५ जणांनी त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली आहे.  इतर व तृतीयपंथीयांनी त्यांच्या आई, पत्नी, वहिनीला शिवीगाळ करुन दमदाटी केली. संतोष लोखंडे यांच्या फिर्यादीवरुन आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

You might also like