Aurangabad : संतापजनक…सलाईन स्टॅन्ड म्हणून मुलीचा वापर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन
राज्यातील सरकारी दवाखान्यांची अवस्था किती बिकट झालेली आहे हे खालील छायाचित्रातून समजतेच. आजही बऱ्याच ठिकाणी कमी खाटा, डॉक्टरांची कमी संख्या, स्वच्छतेचा अभाव, रुग्नांकडे दुर्लक्ष असे चित्र आता सरकारी दवाखान्यात नित्याचे आहे. यातच आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात एका चिमुकलीचा सलाईन स्टँड म्हणून वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे.

औरंगाबादमधील घाटी रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक: 17 मध्ये शस्त्रक्रियेनंतर एकनाथ गवळी यांना सलाईन लावण्यात आले होते. त्यावेळी धृपदा ही सहा वर्षांची मुलगी त्यांच्याजवळ होती. तिच्या हातात सलाईन दिले गेले. ती जवळपास अर्धा ते पाऊण तास अशीच टाचा उंच करून ताटकळत उभी होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणे म्हणजे शिक्षा करून घेण्यासारखे आहे असे म्हणावे लागेल.

दरम्यान ,घाटी रूग्णालयात हा प्रकार पहिल्यांदाच घडला असे नाही. रूग्णालयात आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना कधी स्ट्रेचर स्वत:च ढकलावे लागते तर कधी कधी रूग्णाला नातेवाईकांवर स्वत:च उचलून नेण्याची वेळ येते.