WhatsApp : नव्या पॉलीसीनुसार मित्र, नातेवाईकांसोबतचे प्रायव्हेट चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित

पोलीसनामा ऑनलाइन टीम (ओंकार खेडेकर) –  व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीवरून जगभरातून टीका होत आहे. अनेकजण व्हॉट्सअ‍ॅप सोडून सिग्नल, टेलिग्राम सारख्या मॅसेजिंग अ‍ॅपकडे वळत आहेत. मात्र आज कंपनीने याबाबत युजर्सना स्पष्टीकरण दिले आहे. पॉलिसीत बदल झाला असला तरी मित्र आणि नातेवाईकांसोबतचे तुमचे प्रायव्हेट चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित असणार आहे. नवीन पॉलिसी ही केवळ बिझनेस युजरसाठी असल्याचेही व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे.

तुम्ही आमच्या अ‍ॅपद्वारे मित्रांसह कुटूंबियांशी गप्पा मारू शकता. तुमचे चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित असून तुमच्या प्रायव्हसीला कोणताही धोका नाही, असे ट्विट आज व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे. याबाबत व्हॉट्सअ‍ॅपने एक निवेदन देखील प्रसिद्ध केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने दिलेले स्पष्टीकरण :

आम्ही तुमचे खासगी मॅसेज पाहत नाही किंवा तुमचे कॉल ऐकत नाही. फेसबुकला देखील याची परवानगी दिलेली नाही.

आम्ही तुमचे मॅसेज किंवा कॉल हिस्ट्री चेक करत नाही.

तुम्ही शेअर केलेली लोकेशन बघत नाही किंवा फेसबुकसोबत शेअर करत नाही.

आम्ही तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट फेसबुकसोबत शेअर करत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अजूनही पूर्णपणे खासगी आहेत.

तुम्ही तुमचा व्हॉट्सअ‍ॅपवरचा डेटा डाऊनलोड करू शकता किंवा आपोआप डिलीट करण्याचा पर्याय निवडू शकता.