तुळशीच्या पानांनी अधिक सुंदर होईल तुमची ‘त्वचा’, घरीच करा ‘हे’ सोपे उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन –    तुळशी एक खूप गुणकारी आणि औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या झाडाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व देखील प्राप्त आहे तसेच तुळशी एक सुगंधित वनस्पती देखील आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळशीचे झाड असते. तुळशीची पूजा देखील केली जाते. परंतु ज्याप्रमाणे तुळशी धार्मिक, आरोग्य आणि औषधीसाठी उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे तुळशी आपल्या सौदर्यासाठी देखील फायदेशीर आहे. आपण आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी तुळशीची पाने वापरू शकता. अशा गुणकारी तुळशीचे फायदे आपण जाणून घेऊ.

त्वचा नितळ आणि चमकदार होते –

जर तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोपटे असेल तर तुम्ही तुमची त्वचा नेहमी स्वच्छ ठेऊ शकता, कारण तुळशीच्या पानांमध्ये तुमच्या त्वचेला मुळापासून स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. जर तुमची त्वचा धुळ, माती आणि प्रदूषणामुळे निस्तेज दिसत असेल तर तुळशीच्या पानांनी निस्तेजपणा दूर होईल. विशेष म्हणजे तुळस एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत. उलट यामुळे त्वचा निर्जंतुक होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला तुळशीची पाने घावे लागतील आणि त्यांना वाटून त्यांची पेस्ट करावी लागेल. ही पेस्ट त्वचेवर लावावी आणि त्वचा १५ मिनिटांनी स्वच्छ धुवावी. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि नितळ दिसेल.

चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कमी –

चेहऱ्यावरील पिंपल्स ही सौंदर्यात बाधा आणणारी एक समस्या आहे. आजकाल या समस्येला प्रत्येक व्यक्ती सामोरे जातो. त्यातल्या त्यात तुमची त्वचा जर तेलकट अथवा अती संवेदनशील असेल तर पिंपल्स दूर करणं फार कठीण होते. मात्र ही चिंता चुटकीसरशी दूर होऊ शकते, कारण आता तुळशीच्या पानांच्या फेसपॅकने तुमची ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट, चंदन पावडर आणि गुलाबाचं पाणी एकत्रित करावे आणि फेसपॅक तयार करावा. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक वापरून तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करू शकतात.

चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी करतात –

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरूणपणीच चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र यावर देखील तुळशी फायदेशीर आहे. यासाठी रोज तुळशीची पाने गरम पाण्यास उकळून त्यांचा रस दररोज घेतल्यास त्वचा डिटॉक्स होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा टिकून राहतो, तसेच सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी तुळशीचा काढा पिल्याने तुमचे आरोग्य देखील निरोगी आणि उत्तम राहते.

केसांच्या वाढीस फायदेशीर –

जर तुमचे केस गळत असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. बरेच लोक केसांची फोलिकल्स, कोरडे केस, केस फाटणे अशा अनेक समस्यांना सामोरे जात असतात. जर केसांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल आणि लांब केस मिळवायचे असतील तर तुम्ही तुळशीच्या पानांच्या साहाय्याने केसांचे आरोग्य टिकवू शकता. यासाठी एका भांड्यात तुळशीच्या पानांचा रस घ्यावा आणि या रसात काही थेंब लिंबाचा रस घालावा. हा रस केसांच्या मुळांवर लावावा आणि २० ते ३० मिनिटांनी केस स्वच्छ धुवावेत. असे आठवड्यातून एकदा केल्याने आपल्या केसांचे आरोग्य सुधारेल.

तोंडाची दुर्गंधी दूर होते –

तुळशीची पाने तोंडाची दुर्गंधी दूर करतात. तुळशीची पाने नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचं काम करतात. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्यावी, त्यांनतर ते पाणी थंड करून त्याची चूळ भरावी. असे केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. तसेच दररोज सकाळी उठल्यानंतर तुळशीची पाने चघळल्याने तुमचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.