कान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही देखील वापरता ‘इयर बड्स’ ? एकदा ‘हे’ वाचा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कानात जास्त मळ होणं ही एक सामान्य बाब आहे जी सर्वांनाच येत असते. परंतु जर कानांची योग्य प्रकारे स्वच्छता झाली नाही तर कान दुखणं, खाज येणं, जळजळ होणं, ऐकायला कमी येणं अशा अनेक समस्या येऊ शकतात.

अनेक लोकं अशी आहेत जी कानांची स्वच्छता करण्यासाठी इयर बड्सचा वापर करतात. लोकांचा असा समज असतो की, यामुळं कान उत्तमरित्या स्वच्छ होतात. तुम्हीही कानांसाठी असं काही करत असाल तर सावध व्हा. कारण असं काही करणं कानांसाठी घातक ठरू शकतं. इयर बड्सचा वापर करून जर कानांची स्वच्छता केली तर कोणत्या समस्या येतात याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) जर कानातील मळ काढताना इयर बड्सचा वापर केला तर कानातील मळ हा बाहेर येण्याऐवजी आणखी आत सरकण्याची शक्यता असते. हा मळ कानाच्या नाजूक पडद्याला नुकसान पोहचवू शकतो. यामुळं ऐकायला त्रास होऊ शकतो.

2) इयर बड्सवर कापूस लावलेला असतो. अनेकदा असंही होतं की, कापसाचा काही भाग कानाच्या आतच राहतो. मग जेव्हा अंघोळीवेळी कानात पाणी जातं तेव्हा हा कापूस ओला होतो. परिणामी कानाच्या आत फंगल इंफेक्शन होतं.

3) जर तुम्ही रोजच इयर बड्सचा वापर केला तर आतील त्वचेलाही नुकसान पोहचू शकतं. कारण कानाच्या आतली त्वचा ही तुलनेनं जास्त संवदेनशील असते.

4) आपल्या कानात नैसर्गिकपणेच एक द्रव्य तयार होत असतं. हे चिकट द्रव्य कानात तयार होणारा मळ हा कानाच्या पडद्यापर्यंत पोहचू देत नाही. जेव्हा आपण इयर बड्सचा वापर करतो तेव्हा हे द्रव्य निघून जातं. यामुळं धूळ आणि माती ही कानाच्या पडद्यापर्यंत पोहचू शकते.

5) कान स्वच्छ करताना इयर बड्सचा वापर केला तर यामुळं कानाच्या पडद्यालाही नुकसान पोहचू शकतं. कारण कानाचा पडदा आत किती लाबं आहे हे आपल्या माहित नसतं. कान स्वच्छ करताना इयर बड्स किती आत जात आहे हेही आपल्याला कळत नाही.

6) कान स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इयर बड्सवर कापूस असतो. याच कापसावर अनेक बॅक्टेरिया देखील असतात. जेव्हा आपण कान स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करतो तेव्हा हेच बॅक्टेरिया कानाच्या आत जातात. यामुळं इंफेक्शन होण्याचीही शक्यता असते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत.