दुचाकी असो की स्कूटर चालवताना लोकल ‘ब्रँड’चे हेलमेट घातल्यास होणार दंड, जाणून घ्या नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे सक्तीचे झाल्यानंतर आता याबाबतचा आणखी एक नियम लागू करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. दुचाकीस्वारांना केवळ ब्रँडेड हेल्मेट वापरावेत, तसेच या हेल्मेटचे उत्पादन आणि विक्रीबाबतचा नवा कायदा लागू करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावलं टाकली आहेत. नव्या नियमानुसार लोकल हेल्मेट घालून दुचाकी चालवताना सापडल्यास एक हजार रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. तसेच लोकल हेल्मेटच्या उत्पादनांवर दोन लाख रुपयापर्यंतचा दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यात आली आहे. देशात विना हेल्मेट किंवा लोकल हेल्मेट परिधान करुन दुचाकी चालवताना दररोज 28 लोकांचा मृत्यू होतो.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकीस्वारांना सुरक्षित हेल्मेट पुरवण्यासाठी प्रथमच भारतीय सुरक्षा मानक ब्युरोच्या सुचीत समाविष्ट केले आहे. या अंतर्गत मंत्रालयाने 30 जुलैपर्यंत जारी केलेल्या अध्यादेशामध्ये संबंधितांकडून सल्ला आणि हरकती मागवल्या आहेत. आता 30 दिवसांनंतर याबाबतचा नवा नियम लागू केला जाणार आहे. त्यानुसार हेल्मेट तयार करणाऱ्या कंपनीला हेल्मेटची बाजारात विक्री करण्यापूर्वी बीएसआयकडून हे हेल्मेट प्रमाणित करून घ्यावे लागणार आहे. तसेच राज्य सरकारच्या प्रवर्तन विभागाला लोकल हेल्मेटचे उत्पादन आणि विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी वेळोवेळी तपासणी करण्याचे अधिकार असतील.

विना हेल्मेट किंवा लोकल हेल्मेट घालून प्रवास करताना एखादा दुचाकीस्वार आढळून आल्यास त्याला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नव्या मापदंडानुसार हेल्मेटचे वजन दीड किलोवरून घटवून एक किलो 200 ग्रॅम करण्यात आले आहे. दरम्यान, विना मान्यता हेल्मेट उत्पादन करणे आणि त्याची विक्री करणे हा गुन्हा मानला जाणार आहे. तसेच अशा कंपन्यांना दोन लाख रुपये दंड आणि कारावासीची शिक्षा होऊ शकते.