मोबाईल बंद पाडून त्याच क्रमांकाचा वापर करून सायबर भामटयांनी 5 लाखाला गंडविलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – रिचार्ज करण्यास भाग पडल्यानंतर एकाचा मोबाईल बंद पाडून तो क्रमांक पुन्हा सुरु करून सायबर चोरट्याने 4 लाख 90 हजार रुपये ट्रान्सफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून फसवत असल्याचे दिसून येत आहे.

याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरीनिमित्त पुण्यात असतात. मूळचे मुंबई गिरगाव येथील आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांना एका व्यक्तीने फोन केला. तसेच एका कंपनीकडून बोलत असून, तुमचा पॅक संपत आहे. लॉकडाऊन असल्याने आम्ही रिचार्ज करुन देतो असे सांगितले. पंरतु फिर्यादी यांनी त्यांना रिचार्ज करण्यास नकार दिला. तरीही एका अँपवरून त्यांना 10 रूपांयांचा रिचार्ज केला. त्यानंतर त्यांना फोन करून एक टेक्स्ट मॅसेज पाठविला व तो मॅसेज 121 वर सेंड करण्यास भाग पाडले. त्यावेळी त्यांनी 121 ला एसएमएस केला असता त्यांचा मोबाईल क्रमांक बंद पडला. त्यानंतर या चोरट्याने तो क्रमांक दुसऱ्या सिमकार्डवर सुरू केला आणि त्यावरून त्यांच्या खात्यावरून 4 लाख 89 हजार रुपये ट्रान्सफर केले. त्याना हा प्रकार समजल्यानंतर त्यानी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.