Maharashtra : Covid-19 लस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी जिल्हाधिकारी झाले ‘पॉझिटिव्ह’

उस्मानाबाद : कोरोनाची लस घेतल्यानंतर तब्बल २ आठवड्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते होम क्वारंटाईन असून घरीच उपचार घेत आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांनी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्हाधिकार्‍यांना ताप आल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला होता. चाचणी केल्यावर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दिवेगावकर यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतरही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नये, यासाठी वर्क फ्रॉम होम करणार आहेत.

याबाबत त्यांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत आहेत. त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. पण माझ्याबाबत तोपर्यंत व्हायचा तो परिणाम झालाच असे म्हणाले लागेल.

मी दोन आठवड्यांपूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोरोना विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात. हे सर्व पाहता सर्व फ्रंट लाईन वर्कर्स यांनी अत्यंत सावध राहा. लस घेतल्यानंतरही सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन दिवेगावकर यांनी केले आहे.