उस्मानाबादमध्ये शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात राजीनामासत्र सुरू

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – दोनवेळा आमदार, एकवेळा खासदार असताना उमरगा, लोहारा तालुक्यासह जिल्ह्यात शिवसेना रूजविण्याचे काम करणारे प्रा. रवींद्र गायकवाड यांना पक्षश्रेष्ठींनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी राजीनामासत्र सुरू केले आहे. उमरगा व लोहारा तालुक्यातील बहुतांश सेना पदाधिकार्‍यांनी पहिल्याच दिवशी आपले राजीनामे दिले असून आगामी निवडणुकीत सेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल, अशी शिवसैनिकांना आशा होती. गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होण्याची औपचारिकता बाकी असताना उमरगा, लोहारा, औसा व निलंगा तालुक्यातील अनेक शिवसैनिक उमरगा येथे जल्लोष साजरा करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, मातोश्रीवरून शिवसेनेची उमेदवारी ओम राजेनिंबाळकर यांना जाहीर झाली आणि क्षणात उत्साही चेहर्‍यांचा हिरमूड झाला. संतापलेल्या शिवसैनिकांनी पटापट पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेवर टीका व संताप व्यक्त करून राजीनामे देण्यास सुरूवात केली.

उमरगा येथील युवा सेना शहरप्रमुख संदीप चौगुले, येणेगूरचे सर्कलप्रमुख संदीप जगताप, एकोंडीचे शाखाप्रमुख योगेश दुर्गे, गुंजोटीचे सर्कलप्रमुख विलास व्हटकर, गुंजोटी शाखाप्रमुख योगेश शिंदे यांच्यासह औसा, निलंगा व लोहारा तालुक्यातील अनेक शिवसेना पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे दिले आहेत. अन्य तालुक्यातील गायकवाड समर्थकही आपले राजीनामे देण्यास सुरूवात झाली असून यामुळे लोकसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जो व्यक्ती आमदार असताना दुसर्‍यावेळी उमेदवारी देवूनही विधानसभा निवडणुकीत विजयी होवू शकत नाही. तो अवाढव्य असलेल्या लोकसभा मतदार संघात कसा विजयी होईल ? असा सवाल शिवसैनिकांनी पक्षश्रेष्ठींकडे उपस्थित केला आहे. काही शिवसैनिक अजूनही रवींद्र गायकवाड यांनाच तिकीट मिळेल, दम धरा, अशी भूमिका मांडत होते. या संदर्भात खासदार गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते ‘मातोश्री’वर एका महत्वाच्या बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.