उस्मानाबादेतील शिवसेनेचं बंड शमलं

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेला उस्मानाबादमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. बंडाच्या पवित्र्यात असलेले विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आणि बसवराज वरनाळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शिवसेनेकडून उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण खासदार गायकवाड आणि वरनाळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.

उस्मानाबाद लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. शिवसेनेचे विद्यमान खासदार गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्याने खासदार गायकवाडांसह त्यांचे समर्थक नाराज होते. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले होते. त्यामुळे शिवसेनेत बंड होणार का, याकडे लक्ष लागले होते. मात्र, बंडखोरी शमली आहे.

मी शिवसैनिक असून नाराज नाही. पक्षाचा आदेश आहे, त्याप्रमाणे काम करणार आहे. राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्या कामासाठी भेटलो होतो, असा खुलासा गायकवाड यांनी केला. पक्षाने दोन वेळा आमदार केलं आणि एकदा खासदार केलं, अजून पक्षाने काय द्यायचं? असा सवालही त्यांनी केला. शिवाय संतप्त शिवसैनिकही शिवसेनेचं काम करतील आणि शिवसेनेची ही जागा कायम राहिल, असं खासदार गायकवाड म्हणाले.

दुसरीकडे बसवराज वरनाळे यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण पक्षाच्या आदेशामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचं बसवराज वरनाळे यांनी सांगत शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलं. या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीकडून उस्मानाबादमध्ये निंबाळकर कुटुंबाशी हाडवैर असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेतील बंड थंड झालं असलं तरी खासदार गायकवाड समर्थक यांची शिवसेनेला किती साथ मिळते यावर शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे. ओमराजे निंबाळकर यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.