‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आपल्या साहित्यातून अपेक्षित आणि ग्रामीण जीवनातील वास्तव मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचे दीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.तुपे हे गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षाघातामुळे आजारी होते. त्यांची पत्नी जिजा यांचे काही महिन्यांपूर्वीच पक्षाघाताने निधन झाले होते. उत्तम तुपे यांनाही हा त्रास वाढल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचार सुरु असताना रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील छोट्या गावात उत्तम तुपे यांचा जन्म झाला. गावात काम नसल्याने ते पुण्यात आले. अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दु:खे असे ग्रामीण वातावरण तुपे यांनी चितारले आहे. त्यांचे आंदण, कोबारा, माती आणि माणसे, पिंड हे कथासंग्रह लागोपाठ प्रसिद्ध झाले.
तुपे ऊर्फ अप्पा यांची ‘झुलवा’ ही कांदबरी विशेष गाजली. त्यामुळे ते ‘झुलवा’कार म्हणून ओळखले जाऊ लागले. आंदण या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. ‘काट्यावरची पोट’ ही आत्मकथा आणि ‘झुलवा’ या कांदबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार मिळाला होता.

उत्तम बंडू तुपे यांनी लिहिलेली पुस्तके

आंदण (लघुकथा संग्रह)
इजाळ (कादंबरी)
काट्यावरची पोटं (आत्मचरित्र)
कोबारा (लघुकथा संग्रह)
खाई (कादंबरी)
खुळी (कादंबरी)
चिपाड (कादंबरी)
झावळ (कादंबरी)
झुलवा (कादंबरी)
पिंड (लघुकथा संग्रह)
भस्म (कादंबरी)
माती आणि माणसं (लघुकथा संग्रह)
लांबलेल्या सावल्या (कादंबरी)
शेवंती(कादंबरी)
संतू (कादंबरी)