तब्बल ३० निवडणूका लढविल्या ; आता आईचं मंगळसुत्र विकून ‘हा’ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात बलाढ्य राजकिय पक्षांचे उमेदवार उभे राहिले आहेत. काहींच्या मालमत्ता पाहून तर तुम्ही थक्क व्हाल. परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या या उमेदवाराची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या उमेदवाराने चक्क ३० वेगवेगळ्या निवडणूका आतापर्यंत लढविल्या आहेत. जमेल ती वस्तू विकून सर्वस्व पणाला लावलेल्या या उमेदवाराने चक्क आईचे मंगळसुत्र विकून लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. असं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे.

उत्तम भगाजी कांबळे असं या उमेदवाराचं नाव आहे. उत्तम कांबळे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालूक्यातील शेंबाळ पिंपरी येथील रहिवासी आहेत. त्यांना जिल्ह्यात सर्वच ओळखतात. एम कॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या कांबळे यांनी गावाच्या, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी स्वखर्चातून आंदोलनं, मोर्चे काढले. त्यांनी निवडणूकाही लढविल्या. त्यांनी आतापर्यंत ४ वेळा लोकसभा निवडणूक लढविली आहे. तर ६ वेळा ग्रामपंचायत, ४ वेळा तंटामुक्ती, ३ वेळा पंचायत समिती, १ वेळा जिल्हा परिषद, ६ वेळा विधानसभा अशा ३० निवडणूका लढविल्या आहेत. सध्या ते दोन मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. हिंगोली आणि वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून ते उभे राहिले आहेत.

निवडणूकीसाठी आईचे मंगळसुत्र विकले

उत्तम कांबळे यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तरीही ते निवडणूकीच्या रिंगणात नेहमी उतरतात. त्यांनी आतापर्यंत घरातील अनेक गोष्टी विकून निवडणूका लढल्या आहेत. त्यांनी सर्वस्व पणाला लावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आईचं मंगळसूत्र विकून त्यांनी यावेळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलं आहेत.