काय सांगता ! होय, UP मध्ये मजुरांना चक्क ‘सॅनिटायझर’नं घातली ‘अंघोळ’, ‘बोंबाबोंब’ झाल्यावर ‘अति’उत्साहात झाल्याचं सांगितलं (व्हिडीओ)

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बरेली येथे दिल्ली येथून आलेल्या मजूरांवर सॅनिटायझरने आंघोळ घातल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने आपली चूक झाल्याचे कबूल केले आहे. जिल्हाधिकारी यांनी सांगितले कि, अतिउत्साहाच्या भरात हा प्रकार घडला असून या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी योगी सरकार आणि पोलिसांची निंदा करून टीका केली आहे.

बरेलिच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी करण्यात आली आहे. सीएमओ यांच्या निर्देशानुसार पीडित मजूरांवर उपचार करण्यात येत आहेत. बरेली महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या पथकांना बसेस स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अतिउत्साहात त्यांनी असे कृत्य केले. या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण
दिल्लीवरून परतलेले मजूर बस स्थानकावर बसची वाट पहात होते. त्यावेळी पोलीस त्या ठिकाणे आले. या मजुरांना एकत्र करून एका ठिकाणी बसवण्यात आले. त्यानंतर या मजुरांवर पोलिसांनी सोडीयम हायपोक्लोराईडयुक्त पाण्याची फवारणी केली. या फवारणीने त्यांचे डोळे लाल होऊ लागले. कामगारांसोबत लहान मुले सुद्धा होती. या पाण्याने त्रास होऊ लागल्यानंतर मुले जोरजोरात रडायला लागली होती. काही वेळानंतर फवारणी बंद करण्यात आली. फवारणी बंद केल्यानंतर मजूरांनी तेथून पळ काढला.

विरोधकांकडून निशाणा
मजुरांना सॅनिटायझरने आंघोळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेसच्या सरचिटणी प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, यूपी सरकारला विनंती केली आहे की आपण सर्व जण या आपत्तीविरुद्ध लढत आहोत. पण कृपया अशा प्रकारचे अमानुष कृत्य करू नका. कामगारांना आधीच खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच केमिकलने त्यांना आंघोळ घालणे चुकीचे आहे. यातून त्यांचे संरक्षण होणार नाही मात्र त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

प्रियांका गांधी यांच्यासह बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील योगी सरकराला धारेवर धरले आहे. तसेच या प्रकाराची निंदा केली असून सरकार दडपशाही करत असल्याची टीका करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.