धक्कादायक ! ‘कोरोना’बाधितांची आकडेवारी लपवण्यात उत्तर प्रदेश, बिहार आघाडीवर, अमेरिकन विद्यापीठाचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाबाधितांची संख्या लपवण्यात बिहार आणि उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचा दावा अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्याशिवाय कर्नाटकने कोरोनासंदर्भातील आकडेवारीची नोंद योग्य प्रकारे ठेवल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. ‘मेडरिक्सिव’ या आरोग्यासंदर्भातील ऑनलाइन प्रकाशनामध्ये भारतामधील कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा अहवाल छापून आला आहे.

कोरोनासंदर्भातील आकडेवारीमध्ये स्पष्टता आणि अधिक पारदर्शकता असणे गरजेचे असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने करण्यात येणार्‍या प्रयत्नांसाठी कोरोनाबद्दलची आकडेवारी सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी, आम्ही भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून नोंद करण्यात आलेल्या कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा तुलनात्मक सखोल अभ्यास केला असून त्याचा अहवाल सादर करत आहोत, असे सांगत अहवाल मांडला आहे.

आमच्या अभ्यासामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमधील गुवणत्तेमध्ये मोठी तफावत आहे, असं संशोधकांनी म्हटले आहे. कर्नाटकचा सीडीआरएस हा 0.61 इतका आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहारचा सीडीआरएस शून्य आहे. तर संपूर्ण देशाचा सरासरी सीडीआरएस 0.26 इतका आहे. पंजाब आणि चंढीगडमधील अनेक वेबसाईट क्वारंटाइन केलेल्या रुग्णांची माहिती सार्वजनिक करुन त्यांचा गोपनियतेच्या हक्काचा भंग करत असल्याचेही अहवालामध्ये म्हटले आहे.