दुर्देवी ! बोलेरो कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू, बसखालून काढले मृतदेह

पीलभीत : वृत्तसंस्था –   बोलेरो आणि बसच्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास झाला आहे. कार आणि बसची धडक इतकी जबरदस्त होती की या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 32 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या लोकांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रवाशांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भरधाव वेगात जाणाऱ्या बोलेरो कारची जोरदार धडक बसला झाली. या धडकेत बस शेतात जाऊन उलटली आणि प्रवासी बसखाली दबले गेल्यानं गुदमरले. तर बोलेरो कारमध्ये असलेले प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात शनिवारी पहाटे उत्तर प्रदेशातील पीलभीत येथील पुरानापूर येथे झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस लखनऊवरून पीलीभीतच्या दिशेने जात होती. त्यावेळी समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो कारनं बसला जोरदार धडक दिली. भरधाव कारची धडक एवढी भीषण होती की बस थेट शेतात जाऊन उलटी झाली. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले तर काही प्रवासी बसखाली चिरडले गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी बसमधून प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून 7 जणांना मृत घोषीत केले. या भीषण अपघातात 32 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तर जखमींना तातडीने मदत करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मिळत आहे.