Coronavirus Updates : ‘क्वारंटाईन’मधून पळून गेलेल्या ‘त्या’ मजूरानं घेतला ‘गळफास’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये कोरोना विषाणूला घाबरुन लोक आत्महत्या करत आहे. तेथे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा अशीच घटना तिथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे आपल्या कुटुंबाला भेटायला येणाऱ्या 23 वर्षाच्या प्रवासी मजूराने आत्महत्या केली आहे. त्याला अनेक दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र तो कुटुंबाला भेटण्यासाठी वारंवार क्वारंटाईन सेंटरमधून पळून जात होता.

पोलिसांनी सांगितले की, 28 मार्चपासून गावाच्या बाहेरील बाजूस बांधलेल्या शाळेत 23 वर्षाच्या प्रवासी मजूराला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. एकदा तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी क्वारंटाईन सेंटरमधून पळून गेला त्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे त्याला समजल्यानंतर त्याने आत्महत्या केली. नंतर त्याचा मृतदेह गावाच्या बाहेरील भागात लटकलेला आढळला. पीडित 6 भावंडांमध्ये सर्वात छोटा होता.

पोलिसांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला गेला असून जिल्हा प्रशासन त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देणार आहे. मिटौलीचे एसडीएम दिग्विजय सिंग म्हणाले की, सरकारच्या सूचनेनुसार पीडितेला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. तेथून तो अनेकदा पळून देखील गेला होता. पोलीस त्याला वारंवार शोधून आणून सेंटरमध्ये ठेवत होते. त्याचबरोबर त्याला असेही सांगितले होते की, कुटुंबातील लोक आणि शेजार्‍यांच्या सुरक्षेसाठी त्याला क्वारंटाइन राहणे गरजेचे आहे.

मगलगंज पोलिस स्टेशनचे एसएचओ चंद्रकांत सिंग म्हणाले की, ‘पीडित व्यक्ती क्वारंटाईनमुळे खूप घाबरला होता म्हणून त्याने इतके मोठे पाऊल उचलले. त्याचे दूर राहणे हे सर्वांसाठी सुरक्षित आहे हे त्याला आम्ही वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आम्ही त्याला योग्य आहार आणि इतर आवश्यक सुविधा केंद्रात पुरविल्या होत्या.’ ते पुढे म्हणाले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि यातून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे गुन्हा नोंदविला जाईल.

उत्तर प्रदेशमधील कोरोनाशी संबंधित पाचवी आत्महत्या
उत्तर प्रदेशातील कोरोनाशी संबंधित ही पाचवी आत्महत्या आहे. मंगळवारी ताप आणि सर्दीने ग्रस्त असलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या संपूर्ण गावाला ‘कोरोना विषाणूची लागण होण्यापासून वाचवण्यासाठी’ आत्महत्या केली होती. मथुरा येथे ही घटना घडली होती. यापूर्वी 24 मार्च रोजी कानपूर येथे ताप आणि खोकला असल्यामुळे तरुणाला वाटले की त्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्या भितीने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गेल्या महिन्यात हापूड आणि बरेली मधील 2 तरुणांना वाटले की, त्यांना कोरोनाची लागण झाली त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.