कोरोनाचं भीषण वास्तव ! यमुना नदीत आढळली वाहती प्रेतं, उत्तर प्रदेशातील गावांमध्ये भयानक परिस्थिती

हरीपूर/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या परिस्थितीचं भयानक वास्तव दाखवणारी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील गांवांमध्ये कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळे या ठिकाणी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता हरीपूर जिल्ह्यात यमुना नदीच्या प्रवाहात प्रेतं वाहून येत असल्याचे आढळून आले आहे. यमुना नदीमध्ये अनेक मृतदेह वाहत येत असल्याचे पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. हे मृतेदह नेमके कुठून आले आणि ते कोणाचे आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी गावागावातील लोक मृतदेह यमुना नदीच्या पात्रात सोडून देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

यमुना नदीच्या वाहत्या पाण्यात शुक्रवारी (दि.7) अनेक मृतदेह वाहून आल्याचे दिसून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना दिली. नदीच्या प्रवाहात वाहून आलेल्या प्रेतांच्या घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी हरिपूरचे पोलीस घटनस्थळी दाखल झाले. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली, गावात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे अश्यक्य असल्याने गावातील लोक मृतदेह नदीपात्रात सोडून देत आहेत.

हरिपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अनुपकुमार सिंह यांनी सांगितले की, स्थानिक पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा एका ट्रॅक्टरमधून दोन शव आणण्यात आले होते आणि ते यमुनेच्या प्रवाहात टाकण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांना आणखी काही मृतदेह नदी पात्रात सापडले आहेत.

लहान मुलांनी दिली धक्कादायक माहिती

या प्रकाराबाबात काही स्थानिक लहान मुलांनी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. मागील काही दिवसांपासून अशाच प्रकारे मृतदेह एका ट्रॅक्टरवर टाकून आणले जात आहेत आणि ते नदी पात्रात टाकले जात आहेत. हरिपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या यमुना नदीचा उत्तर बाजूचा काठ कानपूर जिल्ह्यात देखील येतो आणि दक्षिणेचा काठ हरिपूर जिल्ह्यात येतो. यमुना नदी ही कानपूर आणि हरिपूर जिल्ह्याची सीमारेषा आहे. यमुना नदीला मोक्षदायिनी कालिंदीच्या नावाने ओळखले जाते. नदीपात्रात मृतदेह सोडण्याची जुनी परंपरा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नदी पात्रात एक दोन मृतदेह दिसणे हे सामान्य मानले जाते. परंतु कोरोना काळात नदी पात्रात आढळून येणाऱ्या मृतदेहांचे प्रामाण वाढले आहे. यावरुन ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे या घटनेवरुन समजते.

उत्तर प्रदेशात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. जागा मिळत नसल्याने शेतांमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृतांचा आकडा सरकारकडे उपलब्ध नाही. याशिवाय याची कोठेही अधिकृत नोंद केली जात नसल्याचे समजतेय. यामुळे या ठिकाणच्या ग्रामीण भागात नेमके किती मृत्यू झाले हे समजणे अशक्य आहे.