महिलांना मैत्रीच्या जाळ्यात अडकवणारा ‘तोतया’ IPS अधिकारी ‘या’ पध्दतीनं आला गोत्यात

वाराणसी : वृत्तसंस्था – महिलांना मैत्रीच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तोतया आयपीएस अधिकाऱ्याला (fake IPS officer) वाराणसी (Varanasi) पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. या तोतया अधिकाऱ्याने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत शहरातील वेगवेगळ्या भागातील महिलांची फसवणूक केली आहे. अखिलेश मिश्रा असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने महिलांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश मिश्रा हा सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोलीस गणवेशातील स्वत:चे फोटो पोस्ट करत होता. तसेच तो तरुणी आणि महिलांशी चॅटिंग करायचा. त्यांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. काही दिवसांपूर्वी त्याने एका शिक्षिकेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केली. अखिलेशने शिक्षिकेला आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून 1 लाख 60 हजार रुपयांना गंडा घातला. महिलेला संशय आल्यानंतर तिने कँट पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अखिलेशला सोमवारी (दि.7) चौकाघाट परिसरातून अटक केली.

पोलिसांनी आरोपी आखिलेश याच्याकडे चौकशी केली असता, त्याने रॉ अधिकारी असल्याचे सांगून अनेकांना गंडा घातल्याचे चौकशीत समोर आले. अखिलेश हा वाराणसीतील रोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहंशाहपूरचा रहिवासी आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून, पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याने शहरातील किती महिलांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.