गँगस्टरला मुंबईहून UP ला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा मृत्यू

लखनऊ : वृत्तसंस्था – फरार गँगस्टरला मुंबईत पकडल्यानंतर त्याला उत्तर प्रेदशला घेऊन जात असताना रविवारी दुपारी पोलिसांच्या कारला मध्य प्रदेशात अपघात झाला. या अपघातात आरोपी फिरोजचा मृत्यू झाला. तर कारमधील पोलीस जखमी झाले.

लखनऊमधील ठाकूरगंज पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी आरोपीला पकडण्यासाठी मुंबईत गेले होते. बहराईचचा रहिवासी फिरोज याच्या विरोधात ठाकूरगंज पोलीस ठाण्यात 2014 मध्ये गुन्हा दाखल होता. तेव्हापासून फिरोज फरार होता. पोलीस त्याच्या शोधातच होते. सर्व्हीलान्सच्या मदतीनं काही दिवसांपूर्वीच फिरोज मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जगदीश प्रसाद पांडेय, कॉन्स्टेबल संजीव सिंह हे आरोपीचा नातेवाईक अफजलला घेऊन मुंबईत गेले. फिरोजला नालासोपाराच्या झोपडपट्टी परिसरातून अटक केली.

या अटकेनंतर पोलिसांचं पथक शनिवारी रात्री लखनऊला रवाना झालं. रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील चांचौडा पोलीस ठाण्यात पाखरिया पुराजवळ पोलिसांची कार उलटली. या अपघातात गँगस्टर फिरोजचा मृत्यू झाला.

फिरोजचा नातेवाईक अफजलचा हात मोडला. पोलीस कर्मचारी संजीव, जगदीश प्रसाद आणि वाहनचालक सुलभ मिश्रा हे या अपघातात जखमी झाले. रस्त्यावर अचानक गाय आल्यानं तिला वाचवताना कार उलटली. चालकाला डुलकी लागल्यानं अपघात झाला असावा अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. सध्या गुना पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.