उत्तर प्रदेश सरकारचा महिला काँग्रेसतर्फे निषेध

पुणे – उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार होत आहेत. मात्र, बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ चा नारा देणाऱ्या केंद्र सरकारचा अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. बेटी बचाओच्या घोषणा देत सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार महिलाविरोधी आहे, असा संताप महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा सावंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना देण्यात आले. याप्रसंगी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव रेखा चव्हाण, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षा सरुबाई करंडे, महिला काँग्रेस देहूरोडच्या अध्यक्षा ज्योती वैरागर, पूर्व हवेलीच्या अध्यक्षा रुपाली कोंडे, पुणे जिल्हा काँग्रेसच्या समन्वयक प्राजक्ता जानराव उपस्थित होत्या.