काय सांगता ! होय, महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या डोक्यावर आहे ‘एवढं’ कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वच राज्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून ( Reserve Bank ) अनेक राज्य मोठ्या प्रमाणात कर्ज घेत असुन कोणत्या राज्यावर किती कर्ज ( Loan) आहे याची माहिती समोर आली आहे. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी निदेशक मृदुल के. सागर ( Mrudul.K.Sagar ) यांनी राज्यांची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येचे प्रमाण यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार देशभरात उत्तर प्रदेशवर सगळ्यात जास्त कर्ज आहे.

गेल्या तीन वर्षांत उत्तर प्रदेशवर कर्जाचा बोजा २७ टक्क्यांनी वाढला आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात उत्तर प्रदेशवर ४.७३ लाख कोटी रुपये कर्ज होते. त्यात वाढ होऊन हे कर्ज २०१९-२० या आर्थिक वर्षात ६.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कर्जाच्या आकडेवारीत उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त कर्ज महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्रावर ५.०२ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.

या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकावर दरडोईवर ४४,७३४ रुपयांचे, तर उत्तर प्रदेशच्या प्रत्येक नागरिकावर दरडोई ३० हजार रुपयांचे कर्ज आहे. दरडोई कर्जाच्या ( Per capita debt) आकडेवारीत पंजाब अव्वल स्थानी असून, तिथे दरडोई ८२ हजार रुपयांच्या कर्जाचा भार प्रत्येक नागरिकावर आहे. त्याचबरोबर बिहार आणि झारखंडही राज्ये या आकडेवारीत पिछाडीवर आहेत. बिहारवर १.८५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर झारखंडवर ०.९१ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याचबरोबर बिहारमध्ये दरडोई १७,८३० रुपये, तर झारखंडमध्ये दरडोई २७,६७० रुपयांचे कर्ज प्रत्येक नागरिकावर आहे.