संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून केली मारहाण, नंतर कापली जीभ

हाथरस : वृत्तसंस्था – तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून, तिला मारहाण करून तिची जीभ कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमधील ही घटना आहे. सध्या त्या मुलीवर अलीगढ येथील जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात केवळ एका आरोपीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यालाही सोडून देण्यात आलं होतं. त्यामुळं पोलिसांच्या कारवाईलर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

हाथरसच्या चंदपा परिसरात एका गावातील ही घटना आहे. गावातल्याच 4 तरुणांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. इतकंच नाही तर यानंतर त्यांनी तिला माराहण केली आणि तिची जीभ कापली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी गळा आवळून हत्येचा प्रयत्न देखील केला. पीडितेवर आता अलीगढच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेच्या तब्बल 9 दिवसांनी पीडिता शुद्धीवर आली. यानंतर तिनं घडलेली घटना सांगितली. तिच्या जबाबानुसार एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या विरोधात बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र काही दिवसांनी त्याला सोडून देण्यात आलं. त्यामुळं आता पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थि होताना दिसत आहे.