काय सांगता ! होय, मालकीणीचा मृत्यू कुत्र्याला सहन झाला नाही, चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन दिला जीव

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कुत्र्याची इमानदारी आणि मालकाशी असलेला लळा ही केवळ कथाच नसते. कानपूरमधील जया या पाळीव कुत्रीने असा पुरावा दिला आहे ज्यामुळे प्रत्येकाचे डोळे ओले झाले आहे. कानपूरच्या बर्रा मलिकपुरम येथे मालकीणीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह पाहून पाळीव कुत्री जयाला इतकी वेदना झाली की तीसुद्धा घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून मरण पावली.

मलिकपुरम येथे राहणारे डॉ. राजकुमार सचान हमीरपूर येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात आहेत. त्यांनी सांगितले की, पत्नी डॉ.अनिता राज या शहरात आरोग्य विभागात सहसंचालक म्हणून कार्यरत होत्या. मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांना सुमारे आठवडाभरापूर्वी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांचा बुधवारी मृत्यू झाला.

मुलगा तेजस आणि मुलगी जान्हवी त्यांचे मृतदेह घेऊन घरी पोहोचले. मालकीणीचा मृतदेह पाहून जया व्याकुळ झाली. त्यानंतर तेजसने तिला दुसऱ्या मजल्यावर नेऊन बंद केले. जया त्यामधून चौथ्या मजल्यावर पोहोचली आणि तेथून खाली उडी मारली हे पाहून कुटुंबाच्या आणि आसपासच्या लोकांच्या डोळ्यातही अश्रू आले. यानंतर, जयाचा मृतदेह देखील मालकीणीच्या मृतदेहाजवळ ठेवण्यात आला होता. मालकीणीच्या अंत्यसंस्कारानंतर जयाला घराच्या जवळच पुरण्यात आले.

डॉ. राजकुमार यांनी सांगितले की, सुमारे 13 वर्षांपूर्वी बायकोला केपीएम रुग्णालयाजवळ कुत्र्याचे पिल्लू दिसले होते, ज्याच्या शरीरावर किडे होते. डॉ.अनिता तिला रस्त्यावरून उचलून घेऊन घरी आली. उपचारानंतर ती बरा झाल्यावर संपूर्ण कुटुंबाला तिचा लळा लागला. जयाला डॉ.अनिता इतकी आवडत होती की ती घरी येताच सर्व घरात ती नाचून आनंद व्यक्त करीत असे.